नागपूर : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यावर आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच ऐवजी सात सदस्यीय घटनापीठाकडे द्यावी, अशी मागणी ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यावर बोलताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, कुणाला धक्का आहे. याबाबत मी वाच्यता करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला हवी. निकाल सात सदस्यांकडे जाणार की ५ सदस्य करणार हे कोर्ट ठरवेल. यावर विश्वास ठेवायला हवा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राजकीय व्यक्तीने बोलणं अयोग्य आहे. निकालाची वाट पहावी, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
राज्य सरकार भक्कम आहे. उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितलं तर १८४ पेक्षा जास्त मतं मिळतील. त्यांना पाच जजेसच्या खंडपीठावर का विश्वास नाही. सात जजेसकडेच का जायचं आहे, हे त्यांनाच माहीत, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला लगावला.
जे खंडपीठ असेल, येणारा निर्णय मान्य करायला हवा. भाजप कुठल्याही निर्णयाला तयार आहे. पैसे देऊन कुठलंही सरकार बनत नाही. काँग्रेसच्या काळात सरकारचं बरखास्त केले गेले. आम्ही कधीही असे प्रयत्न केले नाही.
आमदारांचं भविष्य धोक्यात होतं म्हणून आमदार शिंदे गटासोबत गेले. महाराष्ट्राचे सरकार गेलं ते उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागण्यामुळे गेलंय. हे खोक्याचं नॅरेटीव्ह सेट करत आहेत. आम्हाला माहीत नाही का खोके कुणी घेतले, असा खोचक सवाल बावनकुळे यांनी विचारला.
१८-१८ महिने तुमच्या खिशात पेन नव्हता. तुमच्या नाकर्तेपणामुळे सरकार गेलं. आपल्या अस्तित्त्वासाठी आमदारांनी आमचं सरकार बनवलं. उद्धव ठाकरे यांनी अजूनही आत्मचिंतन करावं. सकाळचा भोंगा बंद करावा. नाहीतर किंचीत सेनेत चारंच लोकं राहतील, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. गिरीश बापट यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. यालाच संस्कार म्हणतात, असंही बावनकुळे म्हणाले.
ठाकरे यांच्याकडील भोंगा अजून बंद झाला नाही. टीकाटिपण्णी करणे सुरूच असते. त्यामुळं यावर त्यांनी आवर घालावा. नाहीतर आणखी काही लोकं या भोंग्याला कंटाळून पक्ष सोडून जातील, असा इशाराचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. असं झाल्यास ठाकरे गटाकडं उरलेसुरले आमदारही राहणार नाही. खूप कमी लोकांवर पक्ष चालवावं लागेल.