Vidarbha Sahitya Sangh | आज शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची अनोखी ओळख…!
विदर्भ साहित्य संघाला 14 जानेवारी रोजी 99 वर्षे पूर्ण होत आहेत. ही संस्था आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
नागपूर : दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा विदर्भ साहित्य संघाचा (Vidarbha Sahitya Sangh) 99 वा वर्धापनदिन यावर्षी कोरोनाच्या अस्थिर परिस्थितीत सापडला आहे. शासकीय निर्बंधात आभासी माध्यमांद्वारे वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाने घेतला आहे. विदर्भ साहित्य संघाला 14 जानेवारी रोजी 99 वर्षे पूर्ण होत आहेत. ही संस्था आता शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. हा वर्धापनदिन (Anniversary) या संस्थेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असा आहे. वैदर्भीय साहित्यिकांना वाड्मय पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिकाला जीवनव्रती पुरस्कार अशा स्वरूपाचा कार्यक्रम यावर्षीही आयोजित केला होता.
डॉ. पी. डी. पाटील आभासी पद्धतीने करणार उद्घाटन
या वर्धापनदिनासाठी आणि शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार होते. पण, कोरोनाच्या अस्थिर परिस्थितीमुळे आता ते या कार्यक्रमात आभासी पद्धतीने उपस्थित राहून, शताब्दी वर्ष समारंभाचे उद्घाटन करतील. रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे तर विशेष अतिथी म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आणि नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी व विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.
डॉ. उषा देशमुख यांना जीवनव्रती पुरस्कार
यावर्षी जाहीर झालेले विदर्भ साहित्य संघाचे वाड्मय पुरस्कार 14 जानेवारी रोजी प्रदान न करता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून प्रदान करण्यात येतील. डॉ. उषा देशमुख यांना जाहीर झालेला जीवनव्रती पुरस्कार मात्र याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाचे वाड्मयीन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची विदर्भ साहित्य संघाची योजना आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच या कार्यक्रमांचे रितसर आयोजन करण्यात येईल. या वर्धापनदिनाच्या आणि शताब्दी वर्ष उद्घाटनाच्या आभासी कार्यक्रमाला रसिकांनी आणि वाड्मयप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी केले आहे.