गोंदियातील चारगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; नागरिकांच्या सुख-दुःखात होणार सहभागी, कसे ते वाचा…
गोंदियातील चारगाव ग्रामपंचायतीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अंत्यसंस्कारासाठी 1500 रुपये रोख तर प्रथम कन्यारत्नास 1100 रुपयांची भेट देणार आहे. चारगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत यासंदर्भातील ठराव घेतला. असा उपक्रम राबविणारी राज्यातील कदाचित ही पहिली ग्राम पंचायत असेल.
गोंदिया : गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस अंत्यसंस्कारासाठी रोख पंधराशे रुपये देण्यात येणार आहे. तर प्रथम कन्यारत्नास अकराशे रुपयाची भेट देण्यात येणार आहे. असा ठरावच गोंदिया जिल्ह्यातील चारगाव ग्राम पंचायतीने (Gram Panchayat) घेतलाय. या ग्राम पंचायतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील कदाचित पहिली ग्राम पंचायत असावी. नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ही ग्रामपंचायत सर्वश्रृत आहे. आता सरपंच ईश्वरलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत यासंदर्भातील ठराव घेण्यात आलाय. गावातील कुणाचाही मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी रोख मदत करण्याचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे त्यांचा हा ठराव सर्वांनाच पसंत पडला. त्या ठरावाला एकमताने मंजुरी (Resolution unanimously approved) देण्यात आली. त्यामुळे आता येत्या नवीन वित्तीय वर्षात हा ठराव 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याचे चारगावचे सरपंच (Sarpanch of Chargaon) ईश्वरलाल मेश्राम तसेच गावकरी प्रमोद पटले यांनी सांगितले.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मदत होणार
मृताच्या अंत्यसंस्कारासाठी रोख मदत देण्याचा ठराव घेत ग्रामपंचायतीने माणुसकीचे दर्शन घडविले. मात्र एवढ्यावरच सरपंच थांबले नाही तर प्रथम कन्यारत्नास जन्म देणाऱ्या दाम्पत्यास रोख रक्कम सदिच्छा भेट देण्याचाही प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या याही प्रस्तावाला सभेने एकमताने मंजुरी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यात हजार पुरुषांमागे 74 मुली कमी आहेत. त्यामुळं स्त्री जन्माचा स्वागत करून मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ग्राम पंचायतीने हा अभिनव उपक्रम सुरू केल्याची माहिती भाऊलाल पंधरे व मीना बिसेन यांनी दिली.
इतर ग्रामपंचायती धडा घेणार का?
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आर्थिक तंगीने हैराण झाले आहेत. त्यांना थोड्याफार प्रमाणात मदतीचा हात द्यावा या उदात्त हेतूने चारगाव ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरू केलाय. अलीकडेच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत आहे. स्त्री जन्माचे स्वागत करून मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हा नक्कीच स्तुत्य उपक्रम असल्याचं सामाजिक कार्यकर्ते विनोद पटले यांनी सांगितलं. आता गोंदिया जिल्ह्यातील चारगाव ग्राम पंचायतीचा हा अभिनव उपक्रम गोंदिया जिल्ह्यातील ग्राम पंचायतीनेच नव्हे राज्यातील सर्वच ग्राम पंचायतींनी घेणे गरजेचे आहे.