नागपुरातील कुणाल हॉस्पिटलमध्ये तोडफोड; मृतकाच्या नातेवाईकांचा नेमका आरोप काय?
मेयोत गेल्यानंतर तिथंही इसीजी करण्यात आला. तेव्हा आधीच मृतकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या तोडफोडीत रुग्णालयाच्या एकूण आठ लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड झाल्याचा आरोप कुणाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. श्रीवास्तव यांनी केलाय.
नागपूर : मानकापुरातील कुणाल हॉस्पिटलमध्ये (Kunal Hospital) रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. आठ ते दहा लोकांनी त्यांच्या एका मित्राला रुग्णालयात भरती केले. मित्राचा मृत्यू झाल्यानंतर तोडफोड करत डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर स्टाफला मारहाण केली. मानकापूर परिसरात कुणाल हॉस्पिटलमध्ये राहुल ईवनाते नावाच्या 28 वर्षीय तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत आणले होते. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांनी (allegation of the relatives of the deceased) रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केली. तसेच तिथल्या साहित्याची तोडफोड करत बराच वेळ गोंधळ घातला.
रुग्णालयातील साहित्याची तोडफोड
धक्कादायक म्हणजे रुग्णालयात तोडफोड सुरू असताना त्या ठिकाणी काही वृद्ध रुग्ण बाजूलाच पलंगावर होते. मात्र तोडफोड करणाऱ्यांनी त्याची ही तमा न बाळगता रुग्णालयात साहित्याची फेकाफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी सात ते आठ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात असल्याचं मानकापूर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजंती मानडवधारे यांनी सांगितलं. नेमका काय प्रकार घडला आणि चूक कोणाची याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रुग्णालयात झालेला हंगामा आणि तोडफोड यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
आठ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा
कुणाला हॉस्पिटलच्या कॅज्युएल्टीत आल्यानंतर राहुलला डॉ. परवेज यांनी तपासले. कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळं त्यांनी ईसीजी काढला. त्यानंतर राहुलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. संपप्त नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत डॉ. परवेज यांच्या डोळ्याला दुखापत झाली. ईसीजी, मॉनिटरची तोडफोड करण्यात आली. दारे, खिडक्या काचे फोडण्यात आल्या. नातेवाईकांना मृतकाचे शवविच्छेदन करण्यास सांगण्यात आले. मेयोत गेल्यानंतर तिथंही इसीजी करण्यात आला. तेव्हा आधीच मृतकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या तोडफोडीत रुग्णालयाच्या एकूण आठ लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड झाल्याचा आरोप कुणाल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. श्रीवास्तव यांनी केलाय.