आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
राज्यातील तीन पक्षाचं सरकार जास्त दिवस चालणार नाही, अशी अनेकांची भावना होती. पण हे तीन पक्षांचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट झालंय. तुटेगा पर छुटेगा नही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (vijay wadettiwar reaction on corona restrictions in maharashtra)
नागपूर: राज्यातील तीन पक्षाचं सरकार जास्त दिवस चालणार नाही, अशी अनेकांची भावना होती. पण हे तीन पक्षांचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट झालंय. तुटेगा पर छुटेगा नही, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील, असं विधानही वडेट्टीवार यांनी केलं आहे. (vijay wadettiwar reaction on corona restrictions in maharashtra)
विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. पडळकर दीड वर्षे कोठडीत होते. त्यांच्या काय तोंडी लागायचं. त्यांनी विरोबाची शपथ घेवून सांगितलं होतं की भाजपात जाणार नाही, आता ते कुठे आहेत? असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
14 वर्षे मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो. बाळासाहेब ठाकरे यांचा मला आशिर्वाद होता. गेल्या 25 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे. या सरकारमध्ये ओबीसी आणि मदत व पुनर्वसन मंत्री आहे. कधी कॅबिनेट मंत्री होईल असं वाटलं नव्हतं अशा परिस्थितून मी आलो आहे. मी सुद्धा तेंदूपत्ता तोडण्याचे काम केलं. आईने दुसऱ्याकडे स्वयंपाक करुन मला शिकवलं, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील
यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या निर्बंधावर भाष्य केलं. नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची सध्या चर्चा नाही. राज्यात निर्बंध लावले जातील अशी पुढील काही दिवसांसाठी शक्यता नाही. तिसरी लाट येणार हे अटळ आहे. सध्या तिसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे, असं सांगतानाच निर्बंध लावण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. मात्र अद्याप तरी राज्यात निर्बंध कडक करणार असं सुतोवाच नाही. पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असावी. याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो. पण निर्बंध लावायचे की नाही हे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. निर्बंध लागले तर राज्यात लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
तर चार टप्प्यानुसार निर्बंध लावणार
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. म्हणून खबरदारी घेत कोकणात जाताना RTPCR अनिवार्य केलंय. निर्बंध लावायचे झाल्यास चार स्टेजनुसार लावले जातील. राज्यातील सर्व जिल्हयात ऑक्सिजन प्लांट, स्टोअरेज टँक लागले आहेत. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत जास्त रुग्ण येतील. दुसऱ्या लाटेत अंदाज नसल्याने नियोजनात अभाव होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत खबरदारी घेतोय, असंही त्यांनी सांगितलं.
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे देणार
ओबीसी आरक्षण मिळालं नाही तर ओबीसींना 33 टक्के जागा देण्याबाबत सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. डिसेंबरपर्यंत इम्पेरिकल डेटा मिळाला नाही तर तीन महिने निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते, असं ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. हा शंभर टक्के पैसा राज्य सरकारचा आहे. परंतु, कोरोनामुळे निधी कमी पडत आहे. पैसे आले की शिष्यवृत्तीचे पैसे देण्यात येणार आहे. 2000 च्या आधीचे शिष्यवृत्तीचे पैसे देण्यात आले आहेत. 2000 नंतरचे बाकी आहेत, असं त्यांनी सांगितलं.
महाज्योतीतून निधी परत गेला नाही
महाज्योतीतून निधी परत गेला नाही. मी ओबीसीचं काम करतो म्हणून महाज्योतीचे काही संचालक चुकीच्या बातम्या पेरत आहेत. महाज्योतीचा कुठला संचालक संस्थेबाबत चुकीची माहिती देईल, तर संस्थेच्या नियमानुसार कारवाई करू, असा इशारा देतानाच महाज्योतीचा एक संचालक आपल्या नातेवाईकांना एमडी करा असं म्हणत होता. त्याचा नातेवाईक नॅान IAS होता. सारथी संस्थेला IAS एमडी आहे. त्यामुळे महाज्योतीलाही IAS एमडी असावा असा माझा आग्रह होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
ईडी बंगाल, महाराष्ट्रासाठीच तयार केली का?
ईडीच्या कारवायांवरूनही त्यांनी टीका केली. ईडीने पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच तयार केलीय का? अशी अनेकांची भावना आहे. आकसातून कारवाई होऊन नये. जर आकसातून कारवाई होत असेल तर ती राज्य सरकारला टार्गेट करण्यासाठी आहे, असा दावाही त्यांनी केला. (vijay wadettiwar reaction on corona restrictions in maharashtra)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 September 2021 https://t.co/eyGP0Rf5FY #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
संबंधित बातम्या:
राज्यातील मंदिरे कधी उघडणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदाच मोठं विधान
(vijay wadettiwar reaction on corona restrictions in maharashtra)