नागपूर : जलसंपदा विभाग (Water Resources Department), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांच्या हस्ते झाले. सिंचन भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे (Vidarbha Irrigation Development Corporation) कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते होते. माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, संजय वानखेडे, प्रवीण महाजन, राजेश सोनटक्के, उमेश पवार, अंकुर देसाई आदी यावेळी उपस्थित होते. देशात सर्वाधिक जलसाठे राज्याच्या जलसंपदा विभागाने निर्माण केले आहेत. तसेच उपलब्ध प्राचीन, ऐतिहासिक जलसाठे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व जलसाठ्यांचे संवर्धन करून त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखणे भविष्यातील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी लोकांमध्ये जलजागृती होणे आवश्यक असल्याचे मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी विमला म्हणाल्या की, पाणी वापराबाबत जनतेमध्ये गांभीर्य निर्माण करणे हा जलजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच शेती व उद्योगाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होईल. यादृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याची शुद्धता कायम राहील. तसेच होणारा अपव्यय टाळण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. लोकांमध्ये जलस्त्रोत संवर्धनासह तसेच जलप्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले.
जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने विदर्भातील 11 प्रमुख नद्यांच्या पाण्याचे कलश सिंचन भवन येथे आणण्यात आले होते. तसेच उपस्थितांनी पाण्याचा वापर व संवर्धन करण्याबाबत जल प्रतिज्ञा घेतली. 22 मार्चपर्यंत विविध उपक्रमांतून पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. गोसीखुर्द बुडीत क्षेत्रातील 470 मीटर लांबीच्या पुलाच्या कामाचा गौरव इंडियन काँक्रिट इन्स्टिट्यूट आणि अल्ट्राटेकच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे.