Nagpur Crime | लग्नघटिका आली, मंडप सजले, बाल संरक्षण समितीने रोखला विवाह!
लग्नाचा मुहूर्त गुरुवारी 10 मार्चला ठरविण्यात आला. वर-वधूकडील सर्व पाहुणे लग्नमंडपात पोहचले. शुभमंगल सावधान होणार, येवढ्यात सरकारी पाहुणे मंडपात पोहचले. त्यांनी हा बालविवाह असल्याचे लक्षात आणून दिल्यावर विवाह थांबविण्यात आला.
नागपूर : जिल्हा बाल संरक्षण समितीने (District Child Protection Committee) बाल विवाह रोखला. 15 वर्षाची मुलगी तर 18 वर्षाच्या मुलाचा विवाह होणार होता. विवाह मंडप सजला. वऱ्हाडी सजून धजून लग्नाला पोहचले. वर-वधू बोहल्यावर चढण्याच्या तयारी होते. एवढ्यात बाल संरक्षण समिती पथक मंडपात पोहचले. वर आणि वधूच्या वयाचा दाखले (Age certificate of bride and groom) मागताच नातेवाईकांचे धाबे दणाणले. दाखले बघितल्यानंतर हा बाल विवाह थांबविण्यात आला. नागपूरच्या कळमना परिसरात (in Kalmana area of Nagpur) ही घटना घडली.
वर-वधू होते अल्पवयीन
कळमना येथे अल्पवयीन वर-वधूचा विवाह होत असल्याची माहिती चाइल्ड लाइनकडून जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना मिळाली. पठाण यांनी ही माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अपर्णा कोल्हे यांना दिली. अपर्णा कोल्हे यांच्या आदेशानुसार बाल संरक्षण पथक विवाहस्थळी पोहोचले. वर आणि वधूचे वयाचे दाखले तपासले. पाहतात तर काय दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळं हा विवाह थांबविण्याची सूचना करण्यात आली. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा-२००६ ची माहिती वर-वधूच्या आईवडिलांना देण्यात आली. त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
कायदा काय सांगतो
बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांचे लग्न लावले तर वर-वधूचे नातेवाईकांवर कारवाई होऊ शकते. शिवाय डेकोरेशनवाला, आचारी, पंडितजी हेही अडचणीत येऊ शकतात. लग्नासाठी मुलाचे वय 21 वर्षे, तर मुलीचे वय 18 वर्षे असावे. बाल कल्याण समिती सदस्य राजीव थोरात, बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, विनोद शेंडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज राऊत, चाइल्ड लाइन प्रतिनिधी नीलिमा भोंगाडे, सारिका बारापात्रे, आंगणवाडी पर्यवेक्षक ज्योती राहणकर, राजश्री शेंडे, कांचन काळे, मीरा साखरकर, सुवर्णा घरडे, लक्ष्मी हाडके यांनी कायद्याची माहिती करून दिली. त्यानंतर वर-वधूच्या नातेवाईकांनी लग्न थांबविले. लग्नाचे वय पूर्ण होईस्तोवर लग्न करणार नसल्याचे शपथपत्र लिहून दिले.