Nagpur Administration : नागपूर जिल्ह्यात प्रशासन आपल्या गावी, ग्रामीण भागाला न्याय देणारा काय आहे उपक्रम?
हा कार्यक्रम मंडळ मुख्यालयात जिल्हा परिषद शाळा अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहतील.
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एका छताखाली जलद गतीने न्याय देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी (Collector) डॉ. विपिन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी ‘प्रशासन आपल्या गावी ‘ या मंडळ स्तरीय उपक्रमाची सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी या उपक्रमाला सुरुवात करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.नागरिकांची (Citizen) प्रलंबित कामे तातडीने सुटावीत, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये तालुकास्तरीय विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र यावे. नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. या योजनेचे नियंत्रण संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी करणार आहेत.
सर्व तालुक्यात राबविला जाणार उपक्रम
एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये दर शुक्रवारला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांनी शुक्रवारी एका मंडळात हे आयोजन करायचे आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी नियोजन करण्यासाठी सर्व तालुकास्तरीय यंत्रांची बैठक घेऊन कार्यक्रमाची आखणी तहसीलदार करणार आहेत. हा कार्यक्रम मंडळ मुख्यालयात जिल्हा परिषद शाळा अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहतील.
या अधिकाऱ्यांचा राहणार समावेश
यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी ,तालुका उपअधीक्षक ,भूमि अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत गटशिक्षण अधिकारी, नायब तहसीलदार महसूल, नायब तहसीलदार पुरवठा, उपअभियंता महावितरण,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, मंडळातील अधिकारी, शाखा अधिकारी, कर्मचारी तसेच मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक इत्यादी ग्राम पातळीवर कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे.
20 विभाग प्रमुखांचा समितीमध्ये समावेश
या उपक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक अशा जिल्हास्तरीय 20 विभाग प्रमुखांची या समितीमध्ये वर्णी लावण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाने कोणते काम करावे या संदर्भातील निर्देश आज देण्यात आले. प्रत्येक ठिकाणाच्या उपक्रमानंतर अनुपालन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.