Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात
अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता खासदार नसला तरी अमरावतीत मोठा मेळावा लावतोय. बोगस जात प्रमाणपत्र हे मोठं कांड आहे. हे दाबण्यासाठी केंद्र सरकार यांना मदत करतायत, असा आरोपही राऊत यांनी लावलाय.
नागपूर : मुंबईत अखेर राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचनावरून माघार घेतली. इकडं नागपुरात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? अयोध्या आंदोलन, श्रीरामचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. शिवसेनेचं हिंदुत्व हे असा घंटाधारीचं नाही. आमचं हिंदूत्व गदाधारी आहे. आम्हाला कुणी हिंदूत्व शिकवू नये. यांनी कृपया सेनेच्या वाट्याला जाऊ नये. मातोश्रीशी खेळू नका. वीस फूट खाली गाडले जालं. तुमच्या उकळीला दाबण्याची क्षमता शिवसेनेत आहे. मी नागपुरात आहे. उद्धवजींनी (Uddhav Thackeray) मला नागपुरात रहायला सांगितलं. ते म्हणाले, राष्ट्रपती राजवट कशी लागते हे आम्हाला माहीत आहे. पहाटे शपथविधी घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. कायदा कुणाला शिकवायच्या असेल तर राज्यपाल यांना शिकवा. या खासदार बाईंना केंद्राची सुरक्षा का मिळाली? हे खाजगीत सांगू. बोगस प्रमाणपत्र घेऊन ही बाई लोकसभा निवडणूक लढते. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. बोगस प्रमाणपत्रावर निवडूण आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. अशी खूप आव्हानं आम्ही स्वीकारली आणि परतून लावली. तुम्ही पळपुटे आहात, असाही घणाघात त्यांनी केला.
दिल्लीतील कोठीत हनुमान चालीसा वाचावा
यापुढं शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या नादाला कुणी लागलं, त्यांनी गोवऱ्या रचून यावं. गोवऱ्या ही धमकी असले तर गेले दोन दिवस मुंबईत सुरु होतं तेही धमकीच होती, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. दिल्लीत दिलेल्या कोठीत बसून त्यांनी हनुमान चालीसा वाचावा. उद्धवजी यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन आम्ही येथील हनुमानगडावरून केलं. श्रीखंडीच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते आणि हे सुद्धा श्रीखंडी बसलेत. भाजपनं राज्यातील राजकारण खालच्या स्थरावर नेलं. सीबीआय आणि ईडीच्या जोरावर हे राजकारण करत आहेत, असंही ते म्हणाले.
अमरावतीत शिवसेनेचा मेळावा घेणार
संजय राऊत म्हणाले, भाजपा माज कशाच्या जिवावर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हे भाजप माज करतायत. आम्ही जन्मताच माजोरडे आहोत. आमचा माज दोन दिवस बघीतला. आला अंगावर ते घेऊ शिंगावर. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो कुठे? शिवसैनिकांचे आभार मानले पाहिजे की, राज्याचे हे शत्रू आहेत. यांच्या मागे राज्याचे माजी मुख्यमंत्री उभे राहतात. अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता खासदार नसला तरी अमरावतीत मोठा मेळावा लावतोय. बोगस जात प्रमाणपत्र हे मोठं कांड आहे. हे दाबण्यासाठी केंद्र सरकार यांना मदत करतायत, असा आरोपही राऊत यांनी लावलाय.