नागपूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे. सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर त्यांचे अनेक सहकारी बेपत्ता असल्या संदर्भात आरोप केलाय. तसेच नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भातील खरी परिस्थिती लोकांसमोर मांडावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्याचे प्रकरण असोत किंवा शंभर कोटी रुपये वसुलीचे प्रकरण. सचिन वाजे मुख्य आरोपी असल्यामुळे माफीचे साक्षीदार होऊ शकत नाही. त्याऐवजी या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखच माफीचा साक्षीदार झाले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. याप्रकरणी राज्य आणि केंद्रातल्या तपास एजन्सीज नीट तपास करत नाहीत. तसेच प्रकरण न्यायाधीशांसमोर असल्यामुळे आता त्याचा नीट तपास व्हावं आणि सत्य समोर यावं ही जबाबदारी न्यायाधीशांची आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.