नागपूर : बहुसंख्य मतदार हे ओबीसी आहेत. त्यामुळं ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका व्हाव्यात, यासाठी सर्व पक्षांचं एकमत झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे अधिकार राज्य संस्थांकडे परत घेण्याचे विधेयक एकमताने विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली. नागपूर मनपा निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश दिल्यास नागपूर मनपा निवडणूक मे महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व सुरू असताना सोशल मीडियावर (Social Media) निवडणुकीचे वेळापत्रक व्हायरल झाले. यामुळं नागपूर मनपा निवडणुकी बाबत संभ्रम वाढला आहे. त्यामुळं ही निवडणूक मेमध्ये होणार, जूनमध्ये की, आणखी सहा महिने थांबावे लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही निवडणूक केव्हा होईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. कारण सध्या नागपूर मनपाची सत्ता ही प्रशासकाच्या हातात आहे. लोकप्रतिनिधींचे काही चालत नाही. नगरसेवक आता माजी झाले आहेत.
नागपूर, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 15 एप्रिलला लागू होणार आहे. 5 जूनला मतदान तर 10 जूनला मतमोजणी होणार. 10 ते 17 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. भावी नगरसेवकांनो कामाला लागा. अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळं इच्छुकांनी याची खातरजमा करण्यासाठी मनपा प्रशासनाकडं विचारणा केली. हा मेसेज फेक आहे. निवडणूक आयोगाकडून अशी कुठलीही सूचना प्राप्त झाली नाही. असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले. पण, या व्हायरल मेसेजमध्ये काही तत्थ्य नाही, असं मनपा प्रशासनानं स्पष्ट केलं. त्यामुळे उभेच्छुकांची धाकधूक थोडी कमी झाली. कारण हा मेसेज व्हायरल होताच उभेच्छुक अॅक्शन मोडमध्ये आले होते.
तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द झाली. दोन सदस्यीय प्रभागानुसार निवडणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 50 टक्के महिला आरक्षणाचा विचार करता दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे. वॉर्ड फेररचना सुरू करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती आहे.