नागपूर : विदर्भ साहित्य संघाला चौदा जानेवारी 2023 रोजी शंभर वर्षे पूर्ण होतील. विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवाची सुरुवात 14 जानेवारी 2022 पासून 99 व्या वर्धापन दिवसापासून झाली आहे. त्याअनुषंगाने वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. शतक महोत्सव वर्षानिमित्त 2023 चे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) वर्धा येथे आयोजित करण्याचा विचार आहे. यासंदर्भात विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला निमंत्रण धाडले आहे. त्यामुळं 96 वे साहित्य संमेलन वर्ध येथे होईल, असे जवळपास निश्चित मानले जात आहे.
महामंडळाच्या धोरणानुसार, 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा येथून निमंत्रण धाडले आहे. 2023 मध्ये विदर्भ साहित्य संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने महोत्सवी वर्षात संमेलन विदर्भ साहित्य संघाच्या यजमानपदाखाली व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचं विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी सांगितले. तसेच शोभणे यांनी हे निमंत्रण स्वीकारले जाईल, अशी अपेक्षा आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवाला 14 जानेवारीला प्रारंभ होत आहे. कानडी साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोधर मावजो यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर लेखिका संमेलन, अकोला येथे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, राष्ट्रीय कवी साहित्य संमेलन, सतीश पेंडसे यांचे वैदर्भीय प्रतिभावंतांचे व्यक्तिचित्र व मीनाक्षी पाटील यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन, कलावंतांच्या मुलाखती, मॅजिस्टीक गप्पा असे कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेत. तसेच काही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये डॉ. रवींद्र शोभणे संपादित 1980 नंतरच्या कथाकारांच्या कथा, डॉ. तीर्थराज कापगते संपादित झाडी बोली-इतिहास व स्वरूप, डॉ. सतीश तराळ संपादित वऱ्हाडी बोली – परंपरा व इतिहास, डॉ. श्याम धोंड संपादित ऐंशीनंतरची मराठी कविता, डॉ. राजेंद्र डोळके संपादित वैदर्भीय संशोधक व संशोधन आणि डॉ. विलास देशपांडे संपादित विदर्भ साहित्य संघाचा प्रारंभापासून इतिहास ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.