Nagpur NMC Election | आता नंबर कुणाचा? आणखी दोन काँग्रेसचे नगरसेवक भाजपात येणार! भाजपची रणनीती काय
काँग्रेसचे माजी नगरसेवक नितीश ग्वालबंशी यांनी भाजपात प्रवेश केला. आणखी दोन काँग्रेसचे नगरसेवक भाजपात येणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळं आता नंबर कुणाचा अशी चर्चा रंगली आहे. प्रत्यक्ष प्रवेश केल्याशिवाय ते समजणार नाही.
नागपूर : नितीश ग्वालबंशी (Nitish Gwalbanshi) यांनी भाजपात प्रवेश केला. आणखी दोन काँग्रेसचे माजी नगरसेवक (former Congress corporator) भाजपात प्रवेश करतील, असा दावा काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळं आता कोणत्या नगरसेवकाचा नंबर आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. विकास ठाकरे (Vikas Thackeray) हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. ग्वालबंशी हे ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. पण, त्यांनाच भाजपात आणण्यात भाजपचे नेते यशस्वी ठरलेत. त्यामुळं पश्चिम नागपुरात हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितीश ग्वालबंशी हे 2007 मध्ये राष्ट्रवादीकडून लढले. निवडून आले. 2017 मध्ये त्यांनी घड्याळीची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला. त्याही वेळी ते निवडून आले. यावेळी त्यांनी काँग्रेसलाच हात दाखविला.
भाजपची पूर्वतयारी
नागपूर महापालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. सर्वेमधून भाजप नगरसेवकांवर नाराजी असल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकीत नुकसान होऊ नये, यासाठी चांगले उमेदवार आपल्याकडं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसतं. पश्चिम व उत्तर या दोन विधानसभा क्षेत्रात भाजपबद्दल नाराजी आहे. अशावेळी भाजपचा उमेदवार त्याठिकाणी निवडून येणं जड जाऊ शकते. यासाठी आतापासूनच पूर्वतयारी सुरू झाली आहे. सक्षम आणि निवडून येणार उमेदवार पक्षात आल्यास भाजपच्या अशा जागा वाचविता येऊ शकतील. त्यासाठी ही पूर्वतयारी आहे.
प्रभाग दहा ग्वालबंशी कुटुंबीयांशी संबंधित
पश्चिम नागपुरात ग्वालबंशी कुटुंबीयांची मोठी ताकद आहे. त्याही प्रभागातील निवडणुका ग्वालबंशी कुटुंबाभोवती फिरतात. गेल्या निवडणुकीत नितीश ग्वालबंशी हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले. याचा फायदा काँग्रेसला झाला होता. असा दावा ग्वालबंशी कुटुंबीय करतात. पण, ते आता भाजपमध्ये गेल्यानं पश्चिम नागपुरात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्वालबंशी यांच्यासोबत निवडून येणारे नगरसेवक हेही भाजपामध्ये येऊ शकतात. यात भाजप कितीपत यशस्वी होते, ते समजेलच. उत्तर नागपुरातही भाजपने अशाप्रकारचे प्रयोग केल्याची माहिती आहे. पण, त्यात ते यशस्वी झाले नाहीत.