farmer suicide | परिस्थितीशी लढण्यात विजय अखेर पराभूत; का करावी लागली गडचिरोलीतील शेतकऱ्याला आत्महत्या?
घरच्या कर्ता पुरुष म्हणून विजय यांच्यावर सारी जबाबदारी होती. पण, त्या जबाबदारीचे भार त्यांना पेलवता पेलवेना. म्हणून शेवटचा मार्ग निवडावा लागल्याचं त्यांची मोठी मुलगी प्रिया (वय 21) आणि पत्नी वामला (वय 40) यांनी सांगितलं.
गडचिरोली : शेतकरी आत्महत्या हे विदर्भाला लागलेलं एक कलंक. पण, या आत्महत्या का कराव्याशा वाटतात, याची मायबाप सरकारला जाणीव असणं आवश्यक आहे. विजय सावसागडे या ४७ वर्षीय शेतकऱ्यानं अखेर शनिवारी विष प्राशन करून आपली कटकट संपविली. किती दिवस असं तणावात जगायचं. असंच त्यांना आत्महत्या करताना वाटलं असेल. सावसागडे यांना परिस्थितीवर विजय मिळविता आला नाही. शेवटी त्यांना पराभूत व्हावं लागलं.
पाच एकरात फक्त सात पोती धान
विजय मुकुंदा सावसागडे (47) हे कुरखेडा तालुक्यातील वाढोना-भगवापूरचे रहिवासी. त्यांनी पाच एकर शेतात धान पेरले. त्यासाठी वर्षभर राबले. नांगरणी, वखरणी केली. रोगाव उपाय म्हणून औषध फवारणी केली. यासाठी शेतीसाठी कर्ज काढलेली सारी रक्कम खर्च झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसानं घात केला. वर्षाच्या शेवटी सात पोती धान झाले. एका कुटुंबाला वर्षभर खाता येतील. येवढेही हे धान नाहीत. जगाचा पोशिंदा असं ज्यांना म्हणतो. तो स्वतः वर्षभर फक्त भात खाऊ शकेल, अशीही परिस्थिती उरली नव्हती. मग बाकीचा घरचा खर्च कसा करणार?
कृषी पंपाची वीज कापण्यात आली
विजय सावसागडे यांच्या शेतात विद्युत पंप आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते वीजबिल भरू शकले नाही. थकित रक्कम भरण्यासाठी विद्युत विभागानं तगादा लावला. विद्युत महामंडळाचे कर्मचारी आले त्यांनी वीज कापली. ऐन धानाला पाणी देण्याची वेळ. शेवटचं पीक हातात येणार, अशी परिस्थिती असताना वीज कापली गेली. चार महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीचं लग्न झालं. धान पिकले की, कर्ज चुकतं करू असं विजय यांना वाटलं. पण, धानाने बट्टयाबोळ केला. स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळं आत्महत्येचा विचार मेंदूत घर करून गेला. त्याच विचारात त्यांनी स्वतःच जीवन संपविलं.
थकीत वीज बील माफ करण्याची मागणी
मोठ्या मुलीचं लग्न झालं तरी आणखी चार मुली लागोपाठ पाठमोऱ्या आहेत. त्या शिक्षण घेत आहेत. घरी खायलाच नाही, तर शाळा-कॉलेजचा खर्च कसा करणार? घरच्या कर्ता पुरुष म्हणून विजय यांच्यावर सारी जबाबदारी होती. पण, त्या जबाबदारीचे भार त्यांना पेलवता पेलवेना. म्हणून शेवटचा मार्ग निवडावा लागल्याचं त्यांची मोठी मुलगी प्रिया (वय 21) आणि पत्नी वामला (वय 40) यांनी सांगितलं. विद्युत पुरवठ्याचे थकीत बिल माफ करून शासनाकडून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचे भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे.
पाच मुली, पत्नी यांचा सांभाळ कोण करणार?
विजय सावसाकडे 21 उर्फ प्रिया यांचे चार महिन्यांपूर्वी आकाश दाडमल यांच्याशी लग्न झालं. तरी घरी प्रतीक्षा बी. ए. सेकंड इअरला आहे. मनीषा ही बारावी कला शाखेत शिकते. दीक्षा ही दहावी, तर लक्ष्मी नवव्या वर्गात आहे. या साऱ्यांची जबाबदारी आता विजय यांच्या पत्नीवर आली आहे. शिवाय घरची जनावरे पोरकी झाली आहेत. त्यांच्या चारापाण्याचा प्रश्न आहेच. म्हातारी आई यमुना उकुंदा सावसाकडे (आई) यांचा सांभाळ आता कोण करणार?