काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी विहिरीत उडी घेईन, नितीन गडकरी असं का म्हणाले?; काय आहे किस्सा?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या केलेल्या कामामुळे मला आज मॅनेजमेंट जमत आहे, असं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. भंडाऱ्यात एका जनसभेत ते बोलत होते.
भंडारा : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर होती. पण ती नाकारल्याचं सांगितलं. या ऑफरचा किस्साही त्यांनी ऐकवला. एका नेत्याने मला काँग्रेसमध्ये येण्याचं आवातन दिलं. त्यावर मी त्याला काँग्रेसचा सदस्य बनण्याऐवजी विहिरीत उडी घेईन म्हणून सांगितलं होतं, असं नितीन गडकरी म्हणाले. भंडाऱ्यात एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हा किस्सा ऐकवला.
काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही भाजपमधील चांगले कार्यकर्ते आणि नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यास तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, असं जिचकार मला म्हणाले होते. त्यावर, मी लगेच त्यांना उत्तर दिलं. काँग्रेसमध्ये सामील होण्या ऐवजी मी विहिरीत उडी घेईन असं त्यांना सांगितलं होतं. माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास असल्याचंही मी जिचकार यांना सांगितलं होतं, असं नितीन गडकरी म्हणाले.
भाजपने दुप्पट कामे केली
मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने त्यांनी मोदी सरकारची कामे आणि योजना लोकांसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारची तुलनाही केली. काँग्रेसने 60 वर्षात जेवढं काम केलं. त्याच्या दुप्पट काम भाजपने 9 वर्षात केलं आहे, असं दावा त्यांनी केला.
मोदींचं कौतुक
भारताला आर्थिक महाशक्ती बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाचीही त्यांनी स्तुती केली. देशाचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. कारण आपण विकासाची प्रचंड कामे केली आहेत. आपण जेवढी कामे केलीत तेवढी कामे काँग्रेसही करू शकलेली नाही, असंही ते म्हणाले.
अमेरिकेसारखे रस्ते होतील
साकोली येथिल जेवढे ट्रॅक्टर आहेत ते बायो सीएनजी झाले पाहिजे. ही माझी अपेक्षा आहे. कठीण आहे, मात्र साकोली येथील शेतकरी दर महिन्याला त्यातून एक ते दीड लाख रुपये कमवेल हे नक्की. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. 2024 मध्ये उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे दिसतील, असा दावाही त्यांनी केला.