Yavatmal | यवतमाळ-वणी रस्त्याच्या मधोमध उभे आहेत यमदूत!; प्रवाशांच्या अपघातास कारणीभूत खांब काढणार केव्हा?
हे खांब म्हणजे माणसाला वर घेऊन जाणारे यमदूतच आहेत. त्यामुळं हे सहन करणार नाही. तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसू आणि तीव्र निदर्शने करू, असा इशारा टीकाराम कोंगरे यांनी दिला आहे.
यवतमाळ : यवतमाळ-वणी मार्गावर सिमेंट रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबामुळे (electricity poles) अपघाताचं (accident) प्रमाण वाढलंय. सिमेंट रस्ता होऊनंही मध्ये असलेल्या विजेच्या खांबामुळे प्रवाशांचा खोळंबा होतेय. या सिमेंट रस्त्यावर असलेल्या वजेच्या खांबामुळे आतापर्यंत सात ते आठ अपघात झालेत. त्यामुळं खांब तात्काळ काढा, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते टीकाराम कोंगरे यांनी केलीय. यवतमाळ-वणी मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असलेले खांब न हटवल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. रस्त्याचे सिमेंटीकरण झाले. पण, खांब अद्याप हटविण्यात आले नाही. त्यामुळं ते केव्हा हटविणार असा सवाल कोंगरे यांनी विचारला आहे.
विजेचे खांब वाहतुकीस अडथळा
वणी-यवतमाळ सिमेंट रोडचे बांधकाम होऊन सहा महिने झालेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे खांब या रस्त्यावर अगदी मधोमध उभे आहेत. हे खांब वाहतुकीला खोळंबा करत आहेत. याठिकाणी सात-आठ अपघात झाले आहेत. वाहने दुचाकी असोत की, चारचाकी याठिकाणी नेहमी अपघात होतात. यासंदर्भात एमएसीबीला अनेकदा निवेदन दिलीत. त्यांना तोंडी सूचना दिल्यात. फोनवर सांगितलं. पण, अजून हे पोल हटविण्यात आले नाहीत.
खांब हटवा अन्यथा आंदोलन
एमएसीबीने भोंगळ कारभार चालविला आहे. रस्ता होत असताना खांब हटविण्याचे काम कुणाचे आहे, असा प्रश्न विचारण्यात येतोय. खांब हटविण्याचं काम करता येत नसेल, तर एमएसीबीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. येत्या आठ-दहा दिवसांत हे पोल रस्त्यावरून हटविले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण याठिकाणी जीवितहानी झाली आहे. लोकांचे अपघात झाले आहेत. हे खांब म्हणजे माणसाला वर घेऊन जाणारे यमदूतच आहेत. त्यामुळं हे सहन करणार नाही. तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसू आणि तीव्र निदर्शने करू, असा इशारा टीकाराम कोंगरे यांनी दिला आहे.