तुम्ही भेसळयुक्त अन्न पदार्थ तर खरेदी करत नाहीत ना, इतक्या लाखांचा साठा जप्त
10 हजार 883 किलो वजनाच्या अन्नपदार्थाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला.
नागपूर : दिवाळीच्या (Diwali) काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासन (Food, Drug Administration) विभागाने धडक मोहीम राबवते. नागपूरमध्ये वीस लाखांचा अन्नपदार्थांचा साठा भेसळयुक्त (adulterated ) असल्याच्या संशयवरून जप्त केला. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. मात्र, त्याचा फायदा काही व्यापारी घेतात. भेसळयुक्त माल बाजारात आणतात. यावर लक्ष ठेवत अन्न व औषध विभागाने विशेष मोहीम राबवली.
नागपुरात 16 ठिकाणी धाड टाकल्या. यामध्ये 10 हजार 883 किलो वजनाच्या अन्नपदार्थाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 20 लाख 19 हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे.
या जप्त केलेल्या अन्नपदार्थांचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आता अन्न व औषधी प्रशासन विभाग रिपोर्टची वाट पाहत आहे. अशी माहिती अन्न व औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त अभय देशपांडे यांनी दिली.
सणासुदीच्या काळात पैशाच्या लालचेपोटी अनेक जण अशी पावलं उचलतात. मात्र त्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागतो. त्यामुळे आता अन्न प्रशासन विभाग या सगळ्या बाबींवर कडक नजर ठेवून आहे.
दिवाळीनिमित्त रेडिमेट वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी काही दुकानदार अन्नपदार्थांत भेसळ करतात. यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.