17 ऑक्टोबरला झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार, सदस्य सहलीला जाणार असल्याची चर्चा
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे.
सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड येत्या 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress) आपले सदस्य फुटू नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेत आज सगळ्या सदस्यांची बैठक घेतली. सदस्यांना सहलीलासुद्धा नेलं जाणार आहे. मात्र सहलीला नेण्याच्या मागचा उद्देश हा सर्वानुमते घेण्यात आला. कार्यकर्त्यांच्या इच्छेवरून घेण्यात आल्याचं माजी मंत्री राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनी सांगितलं.
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची सोडत झाल्यानंतर 17 तारखेला निवड होणार आहे.
राज्यात सुरू असलेले फोडाफोडीच वातावरण बघता काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कुठेही फूट पडू नये. किंवा सदस्य दुसरीकडे जाऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घ्यायला काँग्रेसने सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या बंगल्यावर सदस्यांची एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार आणि राजेंद्र मुळक हे उपस्थित होते. राज्यामध्ये ज्याप्रमाणे फुटाफुटीच वातावरण सुरू आहे. ते बघता महाविकास आघाडीच्या हातात असलेली ही जिल्हा परिषद फुटू नये किंवा सदस्य दुसरीकडे जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
तसेच सूचनासुद्धा सदस्यांना दिल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सदस्यांची मागणी बघता या सदस्यांना सहलीवर नेलं जाणार असल्याचं राजेंद्र मुळक यांनी सांगितलं. मात्र आमच्या पक्षात कुठलीही फूट पडणार नाही. किंवा आमचे सदस्य दुसरीकडे जाणार नाही याची ग्वाही आम्हाला असल्याचं राजेंद्र मुळक यांनी सांगितलं.