साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांच्याकडून मात्र पुरस्कार स्वीकारण्यास नकार, कारण काय?
नंदा खरे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलाय. पुरस्कार नाकारताना त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीला यंदाचा वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. तसेच प्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मात्र, नंदा खरे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलाय. पुरस्कार नाकारताना त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. यात त्यांनी समाजाकडून आपल्याला भरपूर मिळाले आहे. त्यामुळे 4 वर्षांपूर्वीच पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं (Nanda Khare reject Sahitya Academy award for fictional book Udya).
नंदा खरे म्हणाले, “माझ्या ‘उद्या’ या जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे, असा मला निरोप मिळाला. मात्र, 4 वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे आणि यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. मी पुरस्कार देणार्या सर्व संस्थांचा आदर राखून आणि त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मांडत आहे.”
#साहित्यअकादमीपुरस्कार २०२० ची घोषणा : प्रसिद्ध लेखक नंदा खरे लिखित ‘उद्या’ कादंबरीस #मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे. १ लाख रूपये ,ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.#SahityaAkademiAwards pic.twitter.com/HqCGXrJzxm
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) March 12, 2021
यंदाच्या साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2020’ची घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 20 भाषांसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’, 21 लेखकांना ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 18 भाषांसाठी ‘युवा पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट कलाकृतींमध्ये 20 प्रादेशिक भाषांतील 7 कविता संग्रह, 4 कादंबऱ्या, 5 कथासंग्रह, 2 नाटकं, 1 संस्मरण आणि 1 महाकाव्य यांचा समावेश आहे. यात मराठी भाषेसाठी प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला.
पुरस्काराचं स्वरुप काय?
या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.
पुरस्कारप्राप्त ‘उद्या’ या कादंबरीविषयी
‘उद्या’ या कादंबरीत नंदा खरे यांनी अनेक विषयांना हात घातलाय. त्यात चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नैसर्गित सौदर्य आणि त्याला लागलेली कोळसा उद्योगाची नजर यावरही भाष्य करण्यात आलंय. कोळसा काढण्यासाठी होणारे स्फोट आणि तेथील निसर्गाची राखरांगोळी, उद्ध्वस्त होणारं आदिवासींचं जगणं यावरही त्यांनी भर दिलाय. याशिवाय त्यांनी भांडवलवादी जगात खुली स्पर्धा होते या दाव्याचीही उलटतपासणी केली. तसेच मोजक्या मोठ्या कंपन्या इतर कंपन्यांना लुटत असतात या निरिक्षणावरही त्यांनी या कांदबरीत मांडणी केलीय.
मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 50 हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता डॉ. चंद्रकांत पाटील, कृष्णात खोत आणि के. टी. ढाले पाटील यांचा परीक्षक मंडळामध्ये समावेश होता.
मराठी भाषेसाठी युवा पुरस्काराची घोषणा
साहित्य अकादमीच्या वर्ष 2020 च्या युवा पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. एकूण 18 प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचं साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आलं.
हेही वाचा :
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावला
Sonu Sood | सोनू सूदला ‘भारतरत्न’ द्या, चाहत्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी!
व्हिडीओ पाहा :
Nanda Khare reject Sahitya Academy award for fictional book Udya