‘मातोश्री’चा आदेश, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका, कोर्टात लाखो रुपये भरले, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, काय घडलं?
15 वर्षांपूर्वीच्या आंदोलनात जवळपास 19 शिवसैनिकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते.. कोर्टात यावर नुकतीच सुनावणी घेण्यात आली.
राजीव गिरी, नांदेड : निष्ठावान शिवसैनिकांच्या (Shivsainik) पाठिशी मातोश्री (Matoshree) उभी राहणार. त्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू नका असे आदेश आले अन् नांदेडच्या कोर्ट परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं. कोर्टात19 शिवसैनिकांबाबत खटल्याची सुनावणी सुरु होती. नांदेडमध्ये काही वर्षांपूर्वी हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी 19 शिवसैनिकांना नांदेड कोर्टाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तसेच प्रत्येक आरोपीला 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यातील काही शिवसैनिकांची दंड भरण्याची आर्थिक ऐपत नव्हती. त्यामुळे या शिक्षाविरोधात हायकोर्टात अपिल करणंही अशक्य होतं. अखेर मातोश्रीवर ही बातमी गेली अन् तिथून आदेश आले. शिवसैनिकांसाठीचे लाखो रुपये कोर्टात भरले गेले अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
काय घडली होती घटना?
2008 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना महागाईच्या विरोधात तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आलं होतं. कोणतंही आंदोलन म्हटलं की शिवसैनिक अग्रक्रमानं पुढे असतात, असं समीकरणच त्या काळात होतं. महागाईविरोधातील या आंदोलनातही असंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. काही कारणांनी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं. यात 8 बसची तोडफोड करण्यात आली. तर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. नांदेडमधील वझिराबाद पोलीसांनी या घटनेत 19 जणांवर गुन्हा नोंदवला होता.
शिक्षेत आमदारपुत्रही…
15 वर्षानंतर हे प्रकरण कोर्टात अंतिम टप्प्यावर होतं. 11 एप्रिल रोजी माजी आमदार अनुसया खेडकर, त्यांचे सुपुत्र महेश खेडकर यांच्यासह 19 जणांना न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपये दंड ठोठावला. त्यामुळे खळबळ माजली. विशेष म्हणजे कोर्टात उभे असलेले 19 आणि कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या असंख्य कार्यकर्ते कानात प्राण आणून ऐकत होते.
दंडाची रक्कम भरण्याची अनेकांची आर्थिकत स्थिती नव्हती. शिवसैनिकांकडून वर्गणी गोळा करायला सुरुवातही झाली होती. तर दुसरीकडे मातोश्रीवरून आदेश आले. शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या पाठिशी उभे राहणार. त्याप्रमाणे शनिवारी 15 जणांच्या दंडाची रक्कम कोर्टात जमा करण्यात आली. यापुढील न्यायालयीन प्रक्रियेतही उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलनकर्त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन मिळालं आहे.
नांदेड येथील ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कानावर नांदेडमधील या प्रकरणाची बातमी घातली होती. त्यांच्या पुढाकारातून शिवसैनिकांना ही मदत मिळाल्याचं थोरात यांनी सांगितलं.