Nanded | Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी
संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले. या बंदला सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप 45 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
नांदेड | शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येप्रकरणी (Murder case) दोषींना तत्काळ अटक व्हावी, ही मागणी अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. मंगळवारी बियाणी यांच्या राहत्या घराबाहेर गोळीबार करून त्यांची भर दिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने अवघं नांदेड (Nanded Crime) हादरलं असून या प्रकरणी दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच बियाणी यांची अंत्ययात्रा संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखून धरली. या अंत्ययात्रेत नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आला होता. यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत अंतयात्रा पुढे नेणार नाही असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला होता. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आश्वासन दिल्यानंतर अंतयात्रा पुढे गेली.
काय घडली घटना?
नांदेडमधल प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता शारदानगर येथील त्यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी आणि त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाले. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी दुपारी संजय बियाणी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गुंडांनी त्यांना अगदी जवळून मारल्याचे त्यात दिसले. नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात फ्लॅट देणारे म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडपणी वसुलीसाठी त्यांना धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
दोषींना अटक करा, अन्यथा दिल्लीपर्यंत आंदोलनाचा इशारा
खंडणीखोरांनीच संजय बियाणी यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप संजय बियाणी यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांच्या पत्नीने तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दिला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले. या बंदला सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप 45 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
इतर बातम्या-