Nanded | जिल्हाधिकारी विपीन इटनकरांची नागपूरला बदली, फिट अँड फाइन, सायकलप्रेमी अधिकारी नांदेडकरांच्या राहणार स्मरणात
विपीन इटनकर यांनी स्वतःच्या पत्नीची प्रसूती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात केली होती, त्यांचा हा साधेपणा फार चर्चिल्या गेला. फिटनेसच्या बाबतीत इटनकर कायम दक्ष असतात, त्यामुळेच ते रात्रीबेरात्री सायकल चालवताना शहरात नागरिकांना भेटत असत.
नांदेड: नांदेडचे जिल्हाधिकारी (Nanded Collector) विपीन इटनकर (Vipin Itankar) यांची राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीय. निश्चित कालावधीपेक्षा कमी काळात त्यांची बदली झाल्याने त्यांच्या बदलीमागे स्थानिक राजकीय ताकत असल्याचे सांगण्यात येतंय. मात्र नागपूर (Nagpur) सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात त्यांची बदली झाल्याने इटनकर यांच्या कामाची दखल घेतल्याचे सांगण्यात येतंय. इटनकर यांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा चांगले अधिकारी नांदेडला टिकवल्या जात नाहीत हा नेहमीचा आरोप याही वेळा केला जातोय. लातूर इथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या विपीन इटनकर यांची सव्वा दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली होती. आता ते नागपूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त होतील.
कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी
विपीन इटनकर हे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच कोरोनाची लाट आली. मात्र या लाटेत स्वतः डॉक्टर असलेल्या विपीन इटनकर यांनी प्रभावीपणे काम केलं, कोरोना काळात मृत्यदर कमी राखण्यात ते सर्वांच्या मदतीने यशस्वी झाले होते. त्यासोबतच कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी त्यांचे कायमच प्रयत्न होते. त्यामुळे कोरोनाच्या लाटेत ते नांदेडमध्ये लोकप्रिय झाले. त्या दरम्यान उद्भवलेल्या कोरोना काळात रेमडीसीवीर आणि ऑक्सिजनच्या टंचाईत अहोरात्र जागून त्यांनी काम केले, जिल्हाधिकारी असूनही अनेकदा ते यासाठी रात्री बेरात्री रस्त्यावर उतरले होते.
कुटुंब वत्सल आणि सायकल प्रेमी
विपीन इटनकर यांनी स्वतःच्या पत्नीची प्रसूती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात केली होती, त्यांचा हा साधेपणा फार चर्चिल्या गेला. फिटनेसच्या बाबतीत इटनकर कायम दक्ष असतात, त्यामुळेच ते रात्रीबेरात्री सायकल चालवताना शहरात नागरिकांना भेटत असत. तरुणांनी शरीरस्वास्थ्य आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे असा त्यांचा आग्रह असायचा.
लसीकरण आणि महसूल उत्पन्नात वाढ
विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या दोन्ही साथी जवळून अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्यांनी लसीकरणासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यासोबतच महसूल उत्पनात त्यांच्या काळात वाढ झाली होती.
नागपूर मिळाल्याने आश्चर्य
जिल्हाधिकारी म्हणून विपीन इटनकर यांनी नांदेडला प्रथमच काम केले. मात्र या दरम्यान त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी थेट नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली केलीय. आता इटनकर नागपुरात थेट फडवणीस यांच्या जवळ जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.