राज्याच्या विकासासाठी अशोक चव्हाणांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान
Ashok Chavan Will Inter BJP Today : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महायुतीकडून चव्हाण यांचं स्वागत होत आहे. तर आघाडीकडून टीका. मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मोठं विधान केलंय. वाचा...
स्वप्निल उमप, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नांदेड | 13 फेब्रुवारी 2024 : लोकांच्या हिताची, विकासाची कामे करून घेण्यासाठी मराठवाड्याचा नेता केंद्रात नव्हता. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मागे आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. मराठवाडा आणि नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण यांच्या निर्णयाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे, असं म्हणत काँग्रेस नेते माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी अशोक चव्हाण यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भास्कर खतगावकर यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी चव्हाणांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे.
“अशोक चव्हाणांच्या भूमिकेचं स्वागत”
अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी अशोक चव्हाण यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. भाजपमध्ये जाण्याअगोदर अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती. सर्व पक्षांच्या लोकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहनही भास्कर खतगावकर यांनी केलं आहे.
“आता नांदेडचा विकास होणार”
विदर्भात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत. म्हणून त्या भागातील विकास झाला. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे मराठवाडाचे प्रश्न मार्गी लागतील. मराठवाडा आणि नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने अशोक चव्हाण यांच्या प्रवेशकडे पाहा. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये राहावं लागतं. त्याच दृष्टीने अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे, असं भास्कर खतगावकर यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
दरम्यान काही वेळाआधी अशोक चव्हाण यांनी या पक्षप्रवेशावर माध्यमांशी संवाद साधला. मी आज रितसर भाजपमध्ये आज प्रवेश करत आहे. आज दुपारी माझा पक्ष प्रवेश आहे. आज माझ्या जीवनाचा नवीन अंक सुरू करतोय. उपमुख्यमंत्री देवैंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष शेलार यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.