Nanded PHOTO | सोनारानं कमी वजनाचे दागिने दिले, पंजाबच्या डॉक्टरचं नांदेडच्या गुरुद्वाऱ्यात पुन्हा 4 कोटींचं दान
मागील वर्षी आपण अर्पण केलेल्या दागिन्यात सोने कमी भरल्याची रुखरख या भाविकाच्या मनात होती. मात्र ही कसर भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नांदेडची वारी करत त्यापेक्षाही जास्त वजनाचे सोने, हिरे, जड-जवाहिरयुक्त दागिने अर्पण केले.
नांदेड | पंजाबमधील एका भाविकाने नांदेडमधील (Nanded) गुरुद्वाऱ्याला तब्बल चार कोटी रुपये किंमतीचे दागिने भेट दिले. हे भाविक म्हणजे पंजाबमधील कर्तारपूर इथले गुरुवींद्रसिंग सामरा… व्यवसायाने डॉक्टर असलेल्या गुरवींद्रसिंग यांनी मागील वर्षीच नांदेडमधील गुरुद्वाऱ्यात सोन्याचे दागिने भेट दिले. येथील गुरुगोविंदसिंगजी (Gurugovindsingh) यांच्याप्रती त्यांनी अडीच किलो सोन्याचे दागिने (Golden jewelry) अर्पण करायचे ठरवले होते. त्यानुसार ते मागील वर्षी दागिने घेऊन आले, मात्र येथे आल्यावर दागिन्यांचे वजन कमी भरले. सोन्याचे हे दागिने 1.853 किलोच भरले. त्यामुळे या भाविकाच्या मनाला मोठी चुटपूट लागली होती. देवाच्या चरणी आपण केलेल्या दानात कसूर राहिली, ही भावना त्याच्या मनात प्रबळ झाली आणि यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी त्या वजनापेक्षा जास्त सोन्या-चांदीचे दागिने नांदेडच्या गुरुगोविंदसिंगजी यांच्या चरणी अर्पण केले. या डॉक्टरने तब्बल 4 कोटी रुपये किंमतीचे दागिने गुरुद्वाऱ्याला नुकतेच दान केले.
5,570 पेक्षा जास्त हिरेजडित दागिने
पंजाबमधील डॉक्टरांनी गुरुद्वाऱ्यात एक कलगी, एक सोन्याचा हार अर्पण केला आहे. यातील सोन्याचे वजन 2.853 किलो असून 5,570 हिरे, रत्न यात जडलेले आहेत. हे सर्व दागिने सोनार आणि हिरे घडवणाऱ्या कारागीरांनी अत्यंत मेहनतीने बनवले असून डॉक्टरनेही अत्यंत श्रद्धापूर्वक ते नांदेडमधील गुरुद्वाऱ्याच्या चरणी अर्पण केले आहेत.
दानशूरतेचे कौतुक
मागील वर्षी आपण अर्पण केलेल्या दागिन्यात सोने कमी भरल्याची रुखरख या भाविकाच्या मनात होती. मात्र ही कसर भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नांदेडची वारी करत त्यापेक्षाही जास्त वजनाचे सोने, हिरे, जड-जवाहिरयुक्त दागिने अर्पण केले. देवाची कृपा असल्यामुळे आपले हॉस्पिटल खूप जोमात सुरु आहे. घरी समृद्धी नांदतेय, अशी कबूली या भाविकाने दिली. तसेच माझ्याजवळ देवाला देण्यासाठी आणखी काही नाही. जमीनदेखील नाही. फक्त देवानं जे मला दिलंय, त्यातलाच वाटा मी इथे अर्पण करतोय, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली. पंजाबमधील या डॉक्टरांच्या दानशूरतेचे गुरुद्वारा समितीतर्फे कौतुक केले असून त्यांचे स्वागत करण्यात आले.
इतर बातम्या-