नांदेडः जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव आणि माहूर नगरपंचायतीची निवडणूक (Nagar Panchayat Election) पार पडली असून आता या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अर्धापूर आणि नायगावात काँग्रेसने (Congress) बाजी मारली असली तरीही माहूरमध्ये सर्वपक्षीय बलाबल दिसून आल्याने नगराध्यक्ष कोण होईल, याच्या चर्चा रंगल्या आहेत. आज 7 फेब्रुवारी रोजी माहूर नगराध्यक्ष पदासाठी नामांकनाची तारीख होती. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची मुदत देण्यात आली होती. माहूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसपेक्षा एक जागा अधिक घेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे नगरसेवकांची पळवापळवी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
माहूर नगरपंचायत अध्यक्षपदाचं राजकारण आता शहरापुरते मर्यादित न राहता किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचलं आहे. माहूर नगरपंचायतीत 17 जागांपैकी राष्ट्रवादीने 7 तर काँग्रेसने 6 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 1 तर शिवसेनेने 3 जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याक मुस्लिम तरुण फिरोज दोसानी यांना अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे तर काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे अध्यक्षपद निश्चित होईपर्यंत भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना चांगलाच भाव मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा मिळवणारे शिवसेनेचे नगरसेवक माहूर नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत खरे किंगमेकर ठरणार आहेत. पक्षीय बलाबल आणि महाविकास आघाडीतील सूत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार असताना विनाकारण काँग्रेसने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालवल्याने मुस्लिम समाजात रोष पहायला मिळत आहे. तसेच माहूर शहरात काँग्रेस व शिवसेना नगरसेवक दिसून येत नसल्याने ते सहलीला गेल्याची माहिती मिळाली आहे. शहरात फक्त राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
दरम्यान, 10 फेब्रुवारीपर्यंत नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत माहूरच्या नगरपंचायतीचा गड कुणाकडे येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इतर बातम्या-