Nanded | संजय बियाणींच्या हत्येचा तपास CBI कडे द्यावा, पत्नी अनिता बियाणींची मागणी
नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास लावण्यात पोलीस कमी पडतायत, असा आरोप सर्व स्तरांतून होत आहे.
नांदेड : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची हत्या होऊन एक महिना उलटला . तरीही तपास लागला नाही . तेव्हा राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) द्यावा अशी मागणी संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी (Anita Biyani) यांनी केली . गेल्या 5 एप्रिल रोजी भरदिवसा संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती . या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आलं . पण महिना उलटून देखील पोलिसांनी आरोपीचा शोध लावला नाही . त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी अनिता बियाणी यांनी केली . राज्य सरकारकडे त्यांनी निवेदनाद्वारे तशी मागणी केली . शासनाकडून दखल घेतली गेली नाही तर सीबीआय तपासासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अनिता बियाणी म्हणाल्या.
‘..नाही तर आम्ही कोर्टात जाणार’
संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘आज एक महिन्यानंतरही काहीही शोध नाही. त्यामुळे उद्धवजी ठाकरे सरकारला माझ्या परिवाराची विनंती आहे की त्यांनी ही केस सीबीआयकडे सोपवावी. त्यांनी नाही सोपवली तर मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी यांनी हा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मी विनंती करते. त्यांनीही नाही ऐकलं तर आठ-पंधरा दिवसानंतर आम्ही स्वतः ही केस हायकोर्टात दाखल करून स्वतः लढणार आहोत. पोलीस येऊन जातात, तपास सुरु आहे, एवढंच सांगतात. पोलिसांनी बियाणी साहेबांचे दोन्ही फोन नेलेत, कॅमेरा नेलाय. आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. पण त्यांची फक्त आम्ही करतोयत एवढीच प्रतिक्रिया आहे.
Nanded | संजय बियाणींच्या हत्येचा तपास CBI कडे द्या- पत्नी अनिता बियाणींची मागणी pic.twitter.com/tzH3O8ll9d
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2022
नांदेड पोलिसांसमोर आव्हान
नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास लावण्यात पोलीस कमी पडतायत, असा आरोप सर्व स्तरांतून होत आहे. कुख्यात दहशतवादी रिंदाने काही वर्षांपूर्वी त्यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यामुळे बियाणींच्या हत्येमागे रिंदाचाच हात आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. त्यानंतर बियाणींचे दोन्ही फोन जप्त केल्यानंतर त्यातील डेटाची तपासणी पोलिसांकडून सुरु होती. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. दुसरीकडे रिंदाच्या काही साथीदारांचा नांदेडमध्ये शस्त्रसाठा पुरवण्याचा डाव हरियाणा पोलिसांनी उधळून लावला. त्यामुळे अतिरेकी रिंदाने या कनेक्शन मार्फत नांदेडमध्ये आतापर्यंत काय काय शस्त्रास्त्र साठा पुरवलाय, हे शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यातच बियाणींच्या हत्येचा तपास लवकरात लवकर लावण्यासाठी दबावही वाढत आहे. आता या दोन आव्हानांना पोलीस कशाप्रकारे सामोरे जातात, हे पहावे लागेल.