Load shedding | वीज भारनियमनामुळे पाणी नाही, मिरचीच्या पिकावर रोग, नांदेडमधील शेतकऱ्यांवर संकट
नांदेडमधील वाढत्या उन्हासह लोडशेडिंगचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय.
नांदेडः दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी (farmers) हैराण झाले आहेत. यंदा मार्च महिन्यापासूनच तळपत्या सूर्याची उष्णता (Heat wave) झेलावी लागत आहेत. अशा स्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पिकाचं रक्षण कसं करावं, असा प्रश्न पडत आहे. त्यातच महावितरणकडून सातत्याने वीजेचं भारनियमन (Load Shedding) केलं जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी लाईटही उपलब्ध नाही. परिणामी हाता-तोंडाशी आलेली भाजीपाल्याची पिकं नष्ट होत आहेत. नांदेडमधल्या मिरची उत्पादक शेतऱ्यांसमोर तर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यातच येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पाण्याअभावी मिरचीवर रोग
नांदेडमधील वाढत्या उन्हासह लोडशेडिंगचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. ठोक बाजारात हिरव्या मिरचीला एका किलोला शंभर रूपायापर्यंतचा भाव मिळतोय. मात्र वाढत्या उष्णतेपाठोपाठ सिंचनाला लाईट मिळेनाशी झाली आहे. मिरची उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. चिट मोगरा या गावातील शेतकऱ्यांने दीड एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली. मात्र आता विपरीत स्थितीत दर आठवड्याला 18 ते 25 किलो इतक्याच मिरचीचे उत्पादन होत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितलंय.
मे महिन्यात सूर्य तळपणार
दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रखर उष्णतेच्या झळा सोसल्यानंतर मराठवाड्यात मे महिन्यातही उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कृषी विद्यापीठांतर्फे करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मराठवाड्यातील अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सियसच्या पुढे तापमान गेलं होतं. औरंगाबाद, नांदेडमध्ये 41 अंशांच्या पुढे पारा गेला होता. आता मे महिन्यात ही उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. असा स्थितीत पिकांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
इतर बातम्या-