नंदुरबार जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका; रब्बी हंगाम पाण्यात…
शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी शासनाला नुकसानीचे पंचनामे करून आकडेवारी कोण देणार असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमाने मांडले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नाही तर दुसरीकडे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. नंदुरबार जिल्ह्यात तर सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला आहे. सध्या शेतकरी चारीबाजूंनी संकटात सापडल्याने आता आम्ही जगायचे कसे असा सवाल शेतकरी करू लागला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पाण्यात घातल्यामुळे आता बळीराजा संकटात सापडला आहे. आज धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावा लागणार आहे.
रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, ज्वारी तर फळबागातील केळी, पपई पूर्णतः उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठे संकटाला सामोरे जावा लागणार आहे.
अवघ्या काही दिवसात पीक काढून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे येणार होते, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिला आहे.
तर दुसरीकडे शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी शासनाला नुकसानीचे पंचनामे करून आकडेवारी कोण देणार असा देखील सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आता निसर्गराजाने बळीराजावर संकट आणू नये एवढीच अपेक्षा शेतकरी करू लागला आहे.
शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे शेतमालाला कवडीमोल मिळत आहेत तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.