त्याला काय माहिती आपणच भक्ष होऊ, जेवता जेवता त्याला बिबट्याने उचललं; हृदयद्रावक घटनेने अक्कलकुवात हळहळ
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सात वर्षाचे सुरेश पाडवी याच्यावर बिबट्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नंदुरबार : गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये बिबट्याकडून मानव जातीवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढू लागलंय. विशेषतः जंगल परिसरामध्ये हे हल्ले अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना अधिक आहे. त्यामुळे जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मध्ये अंगणात जेवण करत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात सात वर्षीय चिमूरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरलं असून चिमूकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सात वर्षाचे सुरेश पाडवी याच्यावर बिबट्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुरेश पाडवी हा मुलगा जेवण करण्यासाठी अंगात बसला होता. त्याच वेळी पाठीमागील बाजूने बिबट्याने झडप घातली. झडप घातल्यानंतर बिबट्याने चिमूकल्यावर हल्ला करत फरपटत नेले.
याच दरम्यान कुटुंबासह आजूबाजूच्या नागरिकांनी एकच आक्रोश केला होता. मात्र बिबट्याने चिमूकल्याच्या कमरेच्या खालील भाग जवळपास पूर्ण तोडला होता. त्यामुळे जागेवर चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर या हल्याच्या घटनेनंतर तात्काळ पोलीस दाखल झाले होते.
ग्रामीण भागात बिबटयाच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळेला किंवा सायंकाळी या घटना घडत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. अक्कलकुवा पोलिसांनी चिमूकल्याच्या मृत्यूनंतर आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात अशा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे लहान मुलांना बिबट्या लक्ष करीत असून सायंकाळी लहान मुलांना घराच्या बाहेर पडू नका म्हणून आवाहन केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वणविभाग आणि पोलिस करीत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात आई आपल्या बाळाला दूध पाजत असतांना चार वर्षीय मुलीवर बिबट्याने झडप घातळी होती. त्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर घेऊन जाऊ नये किंवा खेळू देऊ नये असे आवाहन केले जात आहे.