या जिल्ह्यात ७५ दिवसात २८ बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, आता गावागावात जाऊन जनजागृती
कुपोषित मुलं जन्माला येण्याचं प्रमाणं नंदुरबार जिल्ह्यात अधिक आहे. ते कुठेतरी थांबावं म्हणून पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या ७५ दिवसात २८ बालविवाह थांबवले आहेत.
जितेंद्र बैसाणे : नंदुरबार (Nandurbar news) हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस दलाच्यावतीने बालविवाह रोखण्यासाठी थेट गावागावात जाऊन जनजागृती केली जात आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन आणि पोलीस पाटील व गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचे ठराव करत गावात बालविवाह (child marriage) होणार नाही, त्यासाठी पोलिसांनी थेट गावांवर लक्ष केंद्रित केल्याने ७५ दिवसात २८ बालविवाह रोखण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. मागच्या कित्येक दिवसात पोलिसांनी (Police) चांगली कामगिरी केली आहे. ज्या ठिकाणी बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिथं जाऊन पोलिसांनी कारवाई केली आहे.
७५ दिवसात २८ बालविवाह रोखले
नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू या मागील कारणांचा ही विचार केला, तर यामागे बालविवाह हे एक कारण समोर येते. कमी वयात लग्न झालेली माता कुपोषित बाळाला जन्म देत असते. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण संपवण्यासाठी बालविवाह थांबवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांची संख्या मोठी होती. या गोष्टी लक्षात घेत बालविवाह कायद्याचा धाक दाखवून थांबवण्यापेक्षा थेट जनतेत जाऊन या संदर्भातील दुष्परिणाम आणि होणारी कायदेशीर कारवाई याची माहिती पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गावागावात ग्रामसभा आणि जनजागृती सहभाग घेऊन नागरिकांना दिली. त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून, जिल्ह्यात ७५ दिवसात २८ बालविवाह रोखण्यास नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे अशी माहिती पी. आर. पाटील पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी सांगितलं आहे.
कुपोषित मुलं जन्माला येण्याचं प्रमाणं नंदुरबार जिल्ह्यात अधिक आहे. ते कुठेतरी थांबावं म्हणून पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या ७५ दिवसात २८ बालविवाह थांबवले आहेत. त्यामुळं जिल्ह्यात त्यांचं सगळीकडं कौतुक केलं जात आहे. कुपोषण संपवण्यासाठी बालविवाह थांबवणं महत्त्वाचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.