नारायण राणेंचं शिर्डीमधून शिवसेना ठाकरे गटाबाबत मोठं भाकीत, म्हणाले पुढच्या निवडणुकीपर्यंत…
नारायण राणे यांनी आज सहकुटुंब शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं

माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज सहकुटुंब शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देखील राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
आज रामनवमी सोबत भाजपचा स्थापना दिवस पण आहे, त्या निमित्तानं मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे, तर राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात चांगल काम सुरू आहे, देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे, त्यामुळे आता विरोधकांकडे दुसरं काम राहिलं नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेत आहात. विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरे यांचं काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, असं राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना देखील टोल लगावला आहे. संजय राऊत हे दुकान चालवतात. सकाळी उठून मीडियाला बोलावलं जातं. त्यांचं कतृत्व सांगा, देश, राज्य आणि गावासाठी त्यांचं योगदान सांगा. तुम्ही त्यांच्या बातम्या देवू नये अस मला वाटतं. अशा माणसावर बोलून मी वेळ वाया घालवत नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. कर्जमाफीच्या पैशांमधून तुम्ही लग्न, साखरपुडे करतात असं त्यांनी म्हटलं होतं. यावर देखील राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांच वक्तव्य बघत बिघत काही नाही, मात्र त्यांनी जे मत व्यक्त केलं ते चुकीचं आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.