अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल देत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना दोषी ठरवत जन्मेठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात 5 आरोपी होते, त्यापैकी संजीव पुनाळेकर,डॉ . वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे या तिघांची आज कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तर दोघांना शिक्षा सुनावली आणि 5 लाखांचा दंडही ठोठावला. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 11 वर्षांनतर अखेर आज याप्रकरणाचा निकाल लागला. यासंदर्भात दाभोलकर यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली.
न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. आजचा निकाल समाधानकारक नाही. या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करू. या घटनेतील मास्टरमाइंड शोधून काढण्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात धाव घेणार, असे ॲड. ओंकार नेवगी यांनी नमूद केले.
कोर्टाने सुनावली शिक्षा
आरोपी क्रमांक 1 , वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष मुक्त केलं. आरोपी ॲड. संजीव पुनाळेकर यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, त्यांनाही आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. विक्रम भावे, यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी क्रमांक 2 आणि 3 शरद कळसकर, आणि सचिन अंदुरे यांना भांदवि ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेचे शिक्षा दिली. आणि 5 लाख रुपये प्रत्येकी दंड ठोठावला. दंड न भरल्यास एका वर्षाचा आणखी कारावास होईल असा आदश देण्यात आला आहे, असे वकिलांनी सांगितले.
ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला, त्यांचे खुनी शोधण्यासाठी…
या केसमध्ये सुरूवातीपासूनच पुणे पोलिस, क्राईम ब्रांच किंवा सीबीआय यांनी वेगळी थिअरी मांडली होती. ज्या व्यक्तीने आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम केलं, त्यांच्या खुन्याला शोधण्यासाठी, तपासासाठी प्लँचेटचा वापर करण्यात आला, ही शोकांतिका आहे ,असे वकील म्हणाले.
आधी नागोर खंडेलवाल नंतर विनय पवार, सारंग अकोलकर असे दोन दोन वेगवेगळे आरोपी दाखवण्यात आले. 2018 मध्ये आत्ताच्या या आरोपींना (शरद कळसकर आणि सचिन अंदुरे) शूटर्स म्हणून दाखवण्यात आलं. आज त्या दोघांना शिक्षा झाली, या निकालाचा आम्ही आदर करतो. निकालाची सविस्तर प्रत आल्यावर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार. आणि या संदर्भात उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार, असे वकिलांनी नमूद केले.