नवी मुंबई: ओबीसी समाजाचे नेते त्यांच्यावर अन्याय झाल्यास एकत्र येतात. मग मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपले मंत्री काहीच का बोलत नाहीत, असा सवाल नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणावरुन बीडमध्ये मोर्चाचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी नुकताच नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
या टीकेला नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. अजित पवार तुम्हीही उपमुख्यमंत्री आहात, आपण व्यक्तिशः माझे दादा आहात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का? रायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत त्यांच्या गाड्या अडवल्या जातात हे कितपत योग्य आहे ? ओबीसी आणि इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय होत असल्यास एकत्र येतात, मग आपले मंत्री काहीच का बोलत नाहीत, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारला. आता यावर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजप नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
राज्य सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल
Maratha Morcha : कितीही हजारांचा पोलीस बंदोबस्त असू दे, मराठा मोर्चा निघणारच; विनायक मेटेंचा निर्धार