माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील म्हणणारे नरहरी झिरवाळ हंगामी अध्यक्ष
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Nana Patole resigns as Assembly Speaker)
मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. (Narhari Zirwal will be Assembly Speaker)
‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ म्हणणारा आमदार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी
शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ हे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.
शरद पवार साहेब हे माझं दैवत आहेत. त्यांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी विश्वासघात करणार नाही, असं झिरवाळ म्हणाले होते.
कोण आहेत नरहरी झिरवाळ?
नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह झिरवाळ यांनी सलग दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळवला.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचं जागावाटपात ठरलं होतं. तर उपाध्यक्षपद झिरवाळ यांच्याकडे सोपवलं आहे. आता पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील.
हेही वाचा
BREAKING | नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, आता पुढे काय?
(Narhari Zirwal will be Speaker of the Legislative Assembly of Maharashtra)