आरोग्य विद्यापीठाचा संशोधन प्रकल्प सुसाट; इंडियन मेडिकल असोसिएशन करणार सहकार्य, नेमकं होणार काय?
कुलगुरू माधुरी कानिटकर म्हणाल्या की, खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही संख्या व आरोग्य विषयक माहिती संशोधनाकरिता उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य शिक्षणात संशोधन हा महत्त्वपूर्ण विषय आहे. पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत समाजातील आरोग्यविषयक अडचणी समजून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (University) संशोधन प्रकल्प राबवण्यात येत आहे. आता या प्रकल्पाला इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) सहकार्य करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुसाट होणार असून, याचा समाजाला मोठा फायदा होणार आहे. विद्यापीठाचे संशोधन कार्य जागतिक दर्जाचे असावे, यासाठी अध्यासनामार्फत विविध संशोधन उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात खासगी संस्था, शासकीय संस्था, नामांकित व्यक्ती, कंपनी, उद्योजक आदी क्षेत्र अध्यासन सुरू करण्यासाठी पात्र असणार आहेत. संशोधनास चालना देण्यासाठी अध्यासन कार्य करणार आहे. विविध विद्याशाखा, उपचारपध्दती, आंतरविद्याशाखीय संशोधनाला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तर विद्यापीठातर्फे सुरू होत असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालय व आगामी काळातील विविध संशोधन प्रकल्पासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे सहकार्य प्राप्त होणार आहे.
कुलगुरूंसोबत झाली बैठक
विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. त्यात संशोधन सहकार्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार झा, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुबोध मुळगुंद, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, विशेष सेवा अधिकारी डॉ. हर्षल मोरे, डॉ. श्वेता तेलंग, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, उपाध्यक्ष डॉ. उमेश नागपूरकर, सचिव डॉ. कविता गाडेकर, सहसचिव डॉ. सारिका देवरे, नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, खजिनदार डॉ. विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्या माहितीचा उपयोग?
बैठकीत कुलगुरू माधुरी कानिटकर म्हणाल्या की, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढाकारातून तज्ज्ञ डॉक्टर व शिक्षक उपलब्ध होणे गरजचे आहे. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या उभारणीत आपला वाटा मोलाचा आहे. खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही संख्या व आरोग्य विषयक माहिती संशोधनाकरिता उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य शिक्षणात संशोधन हा महत्त्वपूर्ण विषय आहे. पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत समाजातील आरोग्यविषयक अडचणी समजून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
काय होणार संशोधन?
कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, समाजात बालमृत्यू, कुपोषण, महिलांचे आजार, साथरोग आदी संदर्भात संशोधन झाल्यास ते समाजासाठी उपयुक्त ठरेल. सर्वांनी आरोग्य शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालण्याचे काम करावे. आयएमएच्या सर्व सदस्यांनी संशोधन प्रकल्पात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस म्हणाले की, नाशिक येथे विद्यापीठ परिसरात पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करणे अभिमानास्पद बाब आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विद्यापीठास तज्ज्ञ डॉक्टर व मार्गदर्शक उपलब्ध करुन देण्यात येतील. समाजाचे सुदृढ आरोग्य व संशोधनासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कायम सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाला कशी होईल मदत?
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, पदव्युत्तर महाविद्यालयासाठी प्रशासकीय पातळीवर जलद गतीने काम सुरू आहे. यासाठी आवश्यक इंडियन मेडिकल असोसिएशनने सहभाग घेऊन काम केल्यास लवकरच मूर्त रूप येईल. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील यांनी सांगितले की, खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी संशोधन प्रकल्पात काम केल्यास विद्यापीठास मदत होईल.
कशी असेल उपचार पद्धती?
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे म्हणाले की, रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती आवश्यक आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कायम प्रयत्नशील राहील. तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना रुग्णसेवेवेची प्रत्यक्ष संधी दिली जाणार असल्याने विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि स्पेशालिटी सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्याः
नाशिक महापालिकेवर आजपासून प्रशासक राज; झेडपीच्या कारभाऱ्यांना 20 मार्च रोजी निरोप, पण निवडणुका कधी?