नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाने (Corona) अक्षरशः कहर केला आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार केला 2284 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 735 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजमितीस शहरात 3955 इतके रुग्ण हे कोरोना बाधित असून, त्यातील फक्त 231 रुग्णच हे रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक महापालिका दररोज 3000 चाचण्या करत आहे. सगळी आकडेवारी बघता शहरात एकूण चाचण्यांपैकी बाधित होणाऱ्यांची आकडेवारी ही 20.86 टक्के इतकी असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत थेटे यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. मात्र, नाशिककरांनी कोविड सेंटर्स आणि रुग्णालयाकडे पाठ का फिरवली आहे, याचे आश्चर्य कोणालाही पडले असेल. तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
तयारी पाहून व्हाल थक्क
नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रांगा लावाव्या लागल्या. वणवण फिरावे लागले. हे पाहता या लाटेत कसलाही त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट पालिकेने उभारल्याची माहिती स्वतः महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. त्यामुळे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमतेवरून पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटपर्यंत मजल मारली आहे.
बहुतांश खाटा रिकाम्या
महापालिका रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत. मात्र, यातील बहुतांश खाटा रिकाम्या आहेत.
नागरिकांची पाठ का?
नाशिकमधील कोरोनाबाधित बहुतांश नागरिक हे घरीच राहून उपचार घ्यायला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. ज्यांना कोरोना होतो, ती व्यक्ती घरातच विलगीकरणात राहते. विश्रांती घेते. अनेकांना सार्वजनिक ठिकाणी उपचार घेणे आणि राहणे नको वाटते. तर खासगी रुग्णालये हजारो ते लाखो रुपयांच्या घराता बिलाचा मारा करतात. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बहुतेक रुग्ण हे घरी राहून उपचार घेऊन ठणठणीत होताना दिसत आहेत. याला काही तुरळक अपवाद असल्याचेस समोर येत आहे.
काय सांगते आकडेवारी?
– 3 दिवसांत 2284 बाधित
– 5 हजार 344 रुग्ण
– शहरात 3955 रुग्ण
– फक्त 231 रुग्णालयात
– बाधित प्रमाण 20.86%
– रोजच्या चाचण्या – 4000
– आता 6000 चाचण्या करणार
– ऑक्सिजन वर 73 रुग्ण
– व्हेंटिलेटरवर 17 रुग्ण
-होम आयसोलेशन 3724 रुग्ण
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली