Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोनाशून्य मोहीम सुरू; भुजबळांनी प्रशासनाला काय दिला कानमंत्र?
भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे 7 लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करावे.
नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. तसेच उल्लेखनीय काम सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत प्रशासनाकडून होईल. तिसऱ्या लाटेत धोका कमी असला तरी परिस्थिती अद्यापही कोरोनाशून्य नाही. त्यामुळे लसीकरणासह टेस्टींगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. भुजबळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी बोलत होते.
7 लाख लोक लसीकरणापासून वंचित
भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे 7 लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करावे. जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित करावे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन 402 मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
खबरदारीची जबाबदारी प्रत्येकाची
भुजबळ म्हणाले, शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे. त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु शाळकरी मुले बाधित होणार नाहीत यासाठीच्या उपाययोजना व खबरदारी ही शासन-प्रशासनाबरोबरच शाळा प्रशासन, पालकांचीही जबाबदारी असून ज्या शाळांमध्ये मुले बाधित होतील तेथे शाळा तात्काळ बंद कराव्यात तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांमध्ये आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्यथा आस्थापनांवर कारवाई
मॉल्स, मोठी व्यापारी संकुले व किरकोळ दुकानदारांनी लसीकरण प्रमाणपत्राची शहानिशा केल्याशिवाय ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करू नये. जी दुकाने याची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येईल त्यांच्यावर बंद/सील करण्याची कठोर कारवाई करण्याची संबंधित स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने करावी, अशा सूचना भुजबळांनी केल्या. लग्न समारंभ ही कोरोना वाढीच्या संक्रमणातील मोठी सुप्रभात स्प्रेडर असून एखाद्या दुकानात ग्राहक काम संपले तर लगेच निघून जातो, परंतु लग्न समारंभातून तासन् तास लोक विनामास्क वावरताना दिसतात. तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर 50 च्या उपस्थितीने बंधन आल्याने आता लोक वाड्या, वस्त्यांवर खुल्या वातावरणात गर्दी करताना दिसतात. अशा कार्यक्रमांवर वॉच ठेवून दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!