Nashik Corona | अडीच पटींनी लसीकरण, चाचण्या वाढवणार; जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना काय दिले संकेत?
बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण व टेस्टींगची विशेष मोहीम राबवून त्यांवर संबंधित यंत्रणांमार्फत दैनंदिन सनियंत्रण ठेवले जाईल.
नाशिकः नाशिकमध्ये कोरोना (Corona) लसीकरण आणि टेस्टिंगसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी दररोज रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्याही मागील दोन लाटांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे मृत्युदरही कमी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ते नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, नीलेश श्रींगी, भीमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ.उत्कर्ष दुधेडिया, डॉ. सपना पवार व विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुलांचे संक्रमण केवळ 10 टक्के
बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण व टेस्टींगची विशेष मोहीम राबवून त्यांवर संबंधित यंत्रणांमार्फत दैनंदिन सनियंत्रण ठेवले जाईल. दोन ते अडीच पटींनी लसीकरण व टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. बालकांच्या मधील संक्रमणाची आत्तापर्यंतची टक्केवारी ही केवळ 10 टक्के एवढीच असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, बालकांच्या आरोग्याशी कुठल्याही शाळा प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तडजोड न करता शाळा सुरू करताना बारकाईने नियंत्रण व निरीक्षणाची आवश्यकता असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी भाग घेतला.
पालकमंत्री भुजबळांच्या सूचना…
– तिसऱ्या लाटेत धोका कमी, पण परिस्थिती कोरोनाशून्य नाही.
– जिल्ह्यात लसीकरणासह टेस्टींगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवावे.
– जिथे मुले बाधित होतील, तेथील शाळा तात्काळ बंद कराव्यात.
– पालकांनीही आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.
-‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’ची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा.
– मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर 50 च्या उपस्थितीने बंधन नाही पाळल्यास कारवाई.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!