नाशिकः कोरोनाचा पेटलेला वणवा, चौपटीने वाढणारे रुग्ण, राजकीय नेत्यांसह नागरिकांनी धाब्यावर बसवलेले निर्बंध आणि पोकळ घोषणांचा बार पाहता नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या या उद्रेकात अजूनही मृत्युदर कमी आहे. त्यामुळे इतर कसल्याही निर्बंधाची घोषणा करण्यात आली नाही.
कोरोनाचा आढावा
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी. एस. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हे वर्ग राहणार सुरू
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. सर्वांनी मास्क घातला आणि नियम पाळले, तर लॉकडाऊन लावण्याची गरज पडणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. मात्र, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा या जानेवारी अखेरपर्यंत बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा केली. हे वर्ग ऑनलाईन सुरू ठेवल्यास कसलिही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यात दहावी आणि बारावीच्या वर्षाचे महत्त्व लक्षात घेता हे वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र, हे वर्ग घेतानाही कोरोनाच्या साऱ्या प्रतिबंधक नियमांचे पालन केले जावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दुसरा डोस घ्यावा
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करण्यात यावे. तसेच समांरभामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पहिला डोस घेतलेल्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस वेळेत घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.
Nashik | नाशिकमध्ये BOSCH कंपनीला दणका; 730 कामगारांना कामावर घेण्याचे आदेश
Nashik |नाशिकमध्ये 52 हजार 324 नवमतदार; एकूण संख्या तब्बल 46 लाखांच्या पुढे, पण दुबार नावांचे काय?