कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी मोठा निर्णय; नाशिकमध्ये 15 तारखेनंतर लग्नसमारंभांना परवानगी नाही
नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजारहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. | Nashik Lockdown
नाशिक: कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी नाशिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद (Lockdwon in Nashik) राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Weekend Lockdown in Nashik due to coronavirus)
नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजारहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसोंदिवस या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध लागू करण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश असणारं पत्रक जारी केलं आहे.
15 तारखेनंतर लग्नसमारंभांना परवानगी नाही
या नव्या निर्बंधांमध्ये 15 मार्चपासून लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स आणि अन्य ठिकाणी लग्न समारंभ तसेच इथर कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत लग्नसमारंभांसाठी मंगल कार्यालय मालकांनी हॉल देऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे.
बारमध्येही 50 टक्क्याची मर्यादा
खाद्यगृहे, परमिट रुम किंवा बार सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, बारमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय, होम डिलेव्हरीही रात्री दहापर्यंत सुरु राहील.
धार्मिक विधींवरही बंधने
धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल. तसेच शनिवार आणि रविवार मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण….
मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत सध्या तरी लगेच लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईकरांवर सध्या तरी लगेच लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती काय?
राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. काल (8 मार्च) 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी 7 मार्चला 11 हजार 141 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या :
मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत
Maharashtra Lockdown | ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लागू; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
(Weekend Lockdown in Nashik due to coronavirus)