नाशिकमध्ये पाच दिवसांचे बाळ चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद, आईचा भर रुग्णालयात आक्रोश
बाळाला लळा लावण्याचे नाटक करत एका महिलेने नवजात मातेचा विश्वास संपादन केला. यानंतर डिस्चार्जच्या वेळी ही महिला बाळाला बाबांकडे देते सांगत चोरी घेऊन गेल्याची बाब समोर आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास घेत आहे.
Nashik Baby Stole : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका संशयित महिलेने पाच दिवसाच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. बाळाला लळा लावण्याचे नाटक करत एका महिलेने नवजात मातेचा विश्वास संपादन केला. यानंतर डिस्चार्जच्या वेळी ही महिला बाळाला बाबांकडे देते सांगत चोरी घेऊन गेल्याची बाब समोर आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास घेत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मूळ उत्तर प्रदेशातील पण सध्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे राहणारे अब्दुल खान यांची पत्नी सुमन ही प्रसुतीसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. २८ डिसेंबर रोजी तिची प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. तर महिलेची सिझेरिअन प्रसूती झाली होती. प्रसुतीनंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. या दरम्यान एका महिलेने तिच्याशी जवळीक साधली. ती बाळाशी खेळणे, एकत्र जेवण करणे, तिची काळजी घेऊ लागली.
यानंतर शनिवारी या बाळाला आणि महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी या महिलेने त्या बाळाच्या आईला तू आवरुन बाहेर ये, तोपर्यंत मी बाळाला त्याच्या बाबांच्या हातात देते, असे सांगितले. यानंतर बराच वेळ झाल्यानंतर ती महिला आणि बाळ दिसत नव्हते. त्यामुळे त्या बाळाच्या आईने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
सीसीटीव्हीमध्ये कैद
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना घडलेला सर्व प्रकार समजला. यात ती महिला बाळाला घेऊन जातानाही आढळली. बाळ चोरी झाल्यामुळे बाळाच्या आईने रुग्णालयातच आक्रोश केला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची मनंही हेलावल्याचं दिसून आलं. आरोपी महिला ही बाळाला घेऊन जातात सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा शोध सुरू आहे. त्या महिलेनेच फसवून बाळ नेले, असा दावा रुग्णालयाने केला आहे. मात्र यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.