प्रभाग रचना हरकतीवर सुनावणी पूर्ण, नाशिककरांचे लक्ष अंतिम आराखड्याकडे, पुढे काय होणार?
नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे यंदा रंगत वाढणार आहे. पालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर...
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका (municipal corporation) निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर (Ward Formation) आलेल्या 211 आक्षेपांपैकी 161 हरकतींची सुनावणी झाली. मात्र, उर्वरित 62 तक्रारदारांनी या सुनावणीकडे पाठ फिरवली. नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर एक ते 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. यावेळी अक्षरशः आक्षेपांचा पाऊस पडला. मात्र, यातल्या बहुतांश तक्रारी या राजकीय असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 4 पथके तयार केली होती. बहुतांश इच्छुकांनी काही मातब्बर मंडळींनी स्वतःच्या सोयीसाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप केला होता. आता यावर काय निर्णय येणार, याची उत्सुकता आहे.
कशी झाली सुनावणी?
महापालिकेच्या प्रारूप प्रभार रचना हकरतीवर सिडकोचो सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, महापालिका आयुक्त कैलास जाधव, विभागीय महसूल आयुक्तांचे प्रतिनिधी संजय दुसाने, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर असलेले उपजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्यापुढे सुनावणी झाली. प्रत्येक हरकत स्क्रीनवर दाखवली गेली. याच्या नोंदी केल्या गेल्या. या सुनावणीचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
पुढे काय होणार?
हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यावर शिफारस अहवाल 2 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर 10 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. त्यात ओबीसी आरक्षणाबाबत काही निर्णय झाला, तर पुन्हा प्रवर्ग निहाय आरक्षण, स्त्री-पुरुष वर्गवारी प्रसिद्ध केली जाईल. त्यावरही हरकती मागवण्यात येतील. त्यावर पुन्हा सुनावणी होईल.
तर प्रशासक येणार
नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे यंदा रंगत वाढणार आहे. पालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊ शकते. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीच्यांच्या निवडणुकाही या ना त्या कारणाने सतत लांबणीवर पडताना दिसत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यताय. मात्र, प्रकरण कोर्टात गेले, तर ही निवडणूक लांबूही शिकते.
त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग
– आता 133 नगरसेवक
– एकूण प्रभाग 44
– 43 प्रभाग 3 सदस्यीय
– 1 प्रभाग 4 सदस्यीय
पक्षीय बलाबल
– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)
– शिवसेना – 35 (सध्या 33)
– राष्ट्रवादी – 6
– काँग्रेस – 6
– मनसे – 5
– अपक्ष – 4
इतर बातम्याः
Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!
महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!
नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?