Nashik Election | महापालिकेची धुळवड शिगेला; प्रभाग रचना हरकती नोंदवण्यासाठी आज लास्ट चान्स, निवडणूक कधी?
ज्यांना महापालिका निवडणुकीचा अतिशय रंजक चित्रपट येणाऱ्या काळात पाहायचा त्यांनी ऐका. ज्यांना राजकारण्यांची आश्वासने म्हणजे नुसती तोंडाची वाफ दवडणे वाटते त्यांनीही ऐका. ज्यांना नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे स्टंटबाजी वाटते त्यांनी ऐका.
नाशिकः ऐका हो ऐका. ज्यांनी महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीसाठी कंबर कसलीय त्यांनी ऐका. ज्यांना महापालिका निवडणुकीचा अतिशय रंजक चित्रपट येणाऱ्या काळात पाहायचा त्यांनी ऐका. ज्यांना राजकारण्यांची आश्वासने म्हणजे नुसती तोंडाची वाफ दवडणे वाटते त्यांनीही ऐका. ज्यांना नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे स्टंटबाजी वाटते त्यांनी ऐका. ज्यांना प्रभाग रचनेची (ward formation) जाणूनबुजून तोफडफोड केल्याचे वाटते त्यांनीही ऐका. आणि राजकारणासाठी हे लोक काहीही करतील. केव्हाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील, असा समज असणाऱ्या बहुतांश मतदारांनोही ऐका. आता नाशिक (Nashik) महापालिकेच्या निवडणुकीचा एकेक दिवस जवळ येतोय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
79 हरकती दाखल
नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस आहेत. आतापर्यंत तब्बल 79 जणांनी हरकती नोंदवल्या असून, आजही आक्षेपांचा पाऊस पडू शकतो. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 4 पथके तयार केली आहेत. बहुतांश जणांनी काही मातब्बर मंडळींनी स्वतःच्या सोयीसाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप केलाय. यापूर्वीही एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभाग रचना तयार केल्याची चर्चा महापालिकेतच रंगली होती.
तर प्रशासक येणार
नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे यंदा रंगत वाढणार आहे. पालिकेची मुदत येत्या 15 मार्च रोजी संपणार आहे. खरे तर तोपर्यंत निवडणुका होऊन महापालिकेला नवे कारभारी मिळायला हवेत. किमान या काळात आचारसंहिता तरी लागलेली असावी. मात्र, तसे नाही झाले तर महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊ शकते. सध्या जिल्ह्यातील बाजार समितीच्यांच्या निवडणुकाही या ना त्या कारणाने सतत लांबणीवर पडताना दिसत आहेत.
राजकीय पक्षात काय हालचाली?
नाशिकमध्ये बहुतांशी पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. आघाडीसाठी छगन भुजबळांनी साकडे घातले. मात्र, त्यांनाही कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे साऱ्यांनीच स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू केलीय. दुसरीकडे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का, याची चर्चा सुरू होती. मात्र, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी युती होणार नसल्याचे म्हणत तूर्तास तरी या विषयाला पूर्णविराम दिलाय.
अशी होणार निवडणूक…
– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग
– आता 133 नगरसेवक
– एकूण प्रभाग 44
– 43 प्रभाग 3 सदस्यीय
– 1 प्रभाग 4 सदस्यीय
पक्षीय बलाबल
– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)
– शिवसेना – 35 (सध्या 33)
– राष्ट्रवादी – 6
– काँग्रेस – 6
– मनसे – 5
– अपक्ष – 4
इतर बातम्याः