Nashik | बिबट्याशी दिली झुंज; जीवाची पर्वा न करता डोळ्यात माती टाकून वाचवले प्राण !
बिबट्याच्या हल्ल्यात सुरेखा विभुते यांच्या पायाला, गुडघ्याला, तोंडावर जखम झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, वन विभागाला या घटनेची माहिती कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत विभुते यांची चौकशी केली. घटनेनंतर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे.
नाशिकः काळजात मुठभर हिंमत असली की, त्या बळावर अशक्य ती गोष्ट शक्य करता येते. हेच एका आजीबाईंनी (grandmother) दाखवून दिले. नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे फाट्याजवळ एका कामगार महिलेवर (woman) बिबट्याने (leopard) झडप घालून हल्ला चढविला. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या आजीबाईंनी जोरदार आरओरड केली. बिबट्याच्या डोळ्यांत माती टाकली. अन् चित्रपटालाही लाजवेल अशा पराक्रम गाजवत एका महिलेला काळ्याच्या तोंडातून सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे अवघ्या पंचक्रोशीत त्या धाडसी आजीबाईंचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या तोंडून हा प्रसंग ऐकण्यासाठी गावकरी अक्षरशः गर्दी करत आहेत.
नेमके झाले काय?
गोंदे येथील सुरेखा विभुते व शांताबाई शिवाजी रेपूकर. या दोघीही भंगार वेचण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या भंगार वेचण्यासाठी निघाल्या. दोघीही गोंदे फाट्यावरील महामार्गावरुन गोदामाकडे जात होत्या. तेव्हा दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुरेखा विभुते यांच्यावर झडप घातली. त्यांनी प्रतिकार केला. मात्र, त्याचवेळी प्रसंगावधान दाखवत विभुते यांच्यासोबत असलेल्या वयोवृद्ध शांताबाई यांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
बिबट्याशी दोन हात
शांताबाईंनी अगोदर आरडाओरड केली. मात्र, बिबट्या काही केल्या मागे घटत नव्हता. त्यांनी सुरेखा यांना जबड्यात धरलेले. शेवटी शांताबाई धाडसाने पुढे झाल्या. त्यांनी खालची माती हातात घेऊन बिबट्याच्या डोळ्यात टाकली. त्यामुळे तो नमला आणि घाबरून शेपटी घालून त्याने तेथून धूम ठोकली. आजीबाईंचे हे प्रंसगावधान आणि धाडसामुळे सुरेखा विभुते यांचे प्राण वाचले. त्याबद्दल पंचक्रोशीत आजीबाईंचे कौतुक होत आहे.
महिला जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात सुरेखा विभुते यांच्या पायाला, गुडघ्याला, तोंडावर जखम झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, वन विभागाला या घटनेची माहिती कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत विभुते यांची चौकशी केली. घटनेनंतर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. एकूणच या घटनेत आजीबाईंनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता बरोबर असलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याने शांताबाईंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर बातम्याः
Maha Infra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा
महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?