Nashik Leopard : मामाच्या गावी राहायला आलेल्या सहा वर्षांच्या भाचीचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू
Nashik Leopard News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर चिंतेचा विषय ठरु लागला आहे.
नाशिक : नाशिकच्या गिरणारे (Girnare, Nashik) परिसरातील धोंडेगाव येते एका मुलीवर बिबट्याचा (Nashik Leopard News) हल्ला केला. या हल्ल्यात एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्याचा हल्ल्याने (Leopard Attacked) गावात भीतीचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर चिंतेचा विषय ठरु लागला आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात आता एका सहा वर्षांच्या मुलीनं जीव गमावल्यानं संतापही व्यक्त केला जातोय. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या हल्ल्यात तर एका सहा वर्षांच्या मुलीचा जीव गमवावा लागलाय. या मुलीचं नाव गायत्री होतं. या घटनेची माहिती मिळकता वन विभागाचे लोकही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आता या बिबट्याला पकडण्याचं आवाहन वनविभागासमोर उभं ठाकलंय.
मामाच्या गावी आली होती, पण
गायत्री लिलके असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. ती मामाच्या घरी आली होती. मूळची कोचरगावात राहाणारी सहा वर्षांची गायत्री काही दिवसांपूर्वी आपल्या मामाच्या घरी धोंडेगावात राहायला आलेली. रात्री घराबाहेर ती खेळत होती. त्यावेळी बिबट्यानं तिच्यावर हल्ला चढवला. अचानक बिबट्यानं गायत्रीवर झडप घातली आणि तिला गंभीर जखमी केलं. यात गायत्रीचा जागीच मृत्यू झाला
बिबट्याच्या हल्ल्यात प्रचंड घाबरलेल्या गायत्रीच्या मृत्यूनं कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. गिरणारे भागात झालेला हा दुसरा हल्ला आहे. नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरण्याचे प्रकार नवीन नाही. गेल्या पंधरा दिवसातहा गिरणारे मधील बिबट्याचा हा दुसरा हल्ला आहे. रात्रीच्या सुमारास होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यानं या भागातील लोक प्रचंड दहशतीत आहेत.
बिबट्याला पकडण्याचं आव्हान
अनेकदा गंगापूर-गोवर्धन शिवराताही बिबट्या दिसून आलेला आहे. रात्रीच्या वेळी इथल्या लोकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. कधीही बिबट्याचा हल्ला होऊ शकतो, अशी भीती इथल्या नागरिकांना वाटतेय. बिबट्याच्या पाऊलखुणा आणि त्याचा वावर शोधण्याचे प्रयत्नही वनविभागाकडून केले जात आहेत. मात्र त्याला यश येताना पाहायला मिळत नाही. खाद्याच्या शोधात असलेल्या बिबट्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांची चिंता आता नाशिक तालुक्यातील लोकांना सतावू लागली आहे.