मालेगाव, नाशिक : आज बकरी ईद आहे. सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी नमाज अदा केली जात आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय. समान नागरी कायद्यावरून मुफ्ती इस्माईल यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.
समान नागरिक कायदा देश हिताचा नाही. भारतात 839 पर्सनल लॉ आहेत. जे बदलू शकत नाहीत. कुणा कुणाचा कायदा बदलणार आहात? असा सवाल मुफ्ती इस्माईल यांनी विचारला आहे.
बकरी ईदनिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये नमाज अदा करण्यात आली. नाशिकच्या इदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद आणि आषाढीनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानाच्या नमाजसाठी शेकडो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. तेव्हा बोलताना मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.
भारत हा सुंदर देश आहे. त्याचं कारण म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्म आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. समान नागरिक कायदा आला तर स्वतंत्रता संपेल. समान नागरी कायदा लागू झाला तर देशातले बहुसंख्य लोक विरोध करतील आणि कारण अनेक लोकांचं स्वातंत्र्य संपेल, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हणाले आहेत.
पसमंदा (दारिद्री) मुस्लिमांना समान नागरी कायद्याचा फायदा होईल असे नाही. अच्छे दिन ची वाट भारतातला प्रत्येक नागरिक पाहत आहे ते आलेच नाहीत. मुसलमानांची पसमानंदगी संपेल. हे लाकडाचे लाडू आहेत, असं म्हणत मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय.
आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या समान नागरी कायद्याला विरोध करण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. लोकांचा या कायद्याला विरोध आहे आणि लोक तो विरोध करतील, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हटलं आहे.