नाशिक महापालिकेच्या घरपट्टीत 45 लाखांचा घोटाळा; आयुक्तांची कारवाई, महिला लिपिक निलंबित
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती तोळामासा आहे. त्यात उत्पन्नाची सारी मदार ही घरपट्टी आणि पाणीपट्टीवर. मात्र, यालाच घरच्या भेद्यांनी आर्थिक भगदाड पाडल्यामुळे परिस्थिती अजून वाईट झाली आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरू होता, याची चर्चाही आता सुरू झालीय.
नाशिकः ऐन नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर, ऐन महापालिका आयुक्तांची (Commissioner) उचलबांगडी झाल्यानंतर आणि ऐन नवीन महापालिका आयुक्त आल्यानंतर नाशिकमध्ये घरपट्टी घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. पथम दर्शनी हा 45 लाखांचा गैरव्यवहार असून, त्याचा आकडा वाढूही शकतो. याप्रकरणी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी एका महिला लिपिकावर कारवाई करत त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. सध्या महापालिकेने कर भरण्याचे संगणकीकरण केले आहे. त्यामुळे कुठल्याही करदात्याला कुठल्याही विभागात कर भरता येतो. याचा फायदा येथे घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मात्र, त्याचे बिंग आत्ता फुटले आहे. हे पाहता हे हिमनगाचे टोक तरी नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक महापालिकेमध्ये घरपट्टी विभागाचे संगणीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या एका भागातील करदाता दुसऱ्या भागातही कर भरू शकतो. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पासवर्ड देण्यात आला आहे. त्याचाच गैरवापर काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर येत आहे. नाशिकरोड, गांधीनगर, चेहेडी केंद्रावर करदात्यांकडून रक्कम जमा करून घेण्यात आली. मात्र, त्यांना दुसऱ्याच पावत्या देण्यात आल्या. शिवाय नागरिकांनी भरलेली रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली नाही. महापालिकेने मार्च महिन्याचा हिशेब तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
अहवालच दिला नाही
नाशिकरोड भागाची जबाबदारी महापालिकेचे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांच्याकडे आहे. मात्र, त्यांनी आपला अहवालाच सादर केला नसल्याचे समोर आले आहे. हा गैरव्यवहार समोर येताच महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी महिला लिपिक सुषमा जाधव यांना निलंबित केले आहे. आणखी एका कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू आहे. त्यातून अजून काही समोर येते का, हे पाहावे लागेल.
कोणाचे आहेत आशीर्वाद?
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती तोळामासा आहे. त्यात उत्पन्नाची सारी मदार ही घरपट्टी आणि पाणीपट्टीवर. मात्र, यालाच घरच्या भेद्यांनी आर्थिक भगदाड पाडल्यामुळे परिस्थिती अजून वाईट झाली आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरू होता, याची चर्चाही आता सुरू झालीय. त्यामुळे फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार की, बडा अधिकारीही जाळ्यात सापडणार, हे चौकशीअंती कळेलच. इतर बातम्या :