12 फुट कांद्याची प्रतिकृती कशासाठी? कॉँग्रेस सेवा दलाच्या वतीनं भन्नाट आंदोलन; आंदोलकांची मागणी काय?
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी पोहचवण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले असून नाशिक शहरात या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर घसरत चालले असताना शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरल्या होत्या. विरोधी पक्षाने ही रास्ता रोको करत कांद्याचे दर वाढून द्यावे, कांद्याला अनुदान द्यावे अशा स्वरूपाची मागणी केली होती आणि त्यानंतर विधिमंडळात देखील कांद्याचा प्रश्न विरोधकांनी लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले होते.
त्यानंतरही शेतकऱ्यांनी सरकारच्या या घोषणेवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील लासलगाव येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या. कांद्याला प्रतिक्विंटल साधारणपणे 1200 रुपये खर्च येतो, त्यात 600 ते 700 रुपये असा दर कांद्याला बाजार समितीत मिळतोय.
तर दुसरीकडे तीनशे रुपये अनुदान देऊन कांद्याचा झालेला खर्चही निघत नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता हवालदिन झाला आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी अशा स्वरूपाची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी ही सुरू करण्यात आली आहे. मात्र नाफेडकडून कांदा खरेदी अल्प ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा हवा तसा मोबदला मिळेलच याची काही शाश्वती नाहीये. त्यामुळे नाशिकच्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा हाती घेतला आहे.
नाशिक मधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याची तेरा फूट प्रतिकृती तयार करून सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय. कांद्याला योग्य हमीभाव द्या अशी मागणी करत कांद्याचा दिलेले अनुदान वाढवून देण्याची मागणी देखील केलेली आहे.
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. याशिवाय कांद्याची तेरा फूट प्रतिकृती उभारून शेतकऱ्यांचा मुद्दा हा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय.
कॉंग्रेसचे आंदोलन सुरू असतांना रस्त्याने जाणाऱ्या नाशिककरांचे लक्ष या आंदोलने वेधून घेतले होते. अनोख्या आंदोलनाची नाशिक शहरात जोरदार चर्चा होती. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात कॉंग्रेसने केलेले हे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिकमधील शेतकरी अनुदान देऊनही अद्याप नाराज आहे. हाच नाराजीचा मुद्दा कॉंग्रेसने लावून धरला आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात असून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखे आंदोलन केले जात आहे.