आईच्या डोळ्या देखत काळजाचा तुकडा गेला, अंगणात खेळत असलेल्या चिमूकलीवर बिबट्याची झडप; आईने किंचाळी मारली पण…
नाशिक जिल्ह्यात सध्या एक नवं संकट निर्माण झाले आहे. बिबट्याने चिमुकले आणि लहान जनावरे यांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये नुकतीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणपाडे येथे आईच्या समोरच अंगणात खेळत असलेल्या चिमूरडीवर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमूरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वीही अनेकदा लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार आशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारातील ब्राम्हणवाडे पिंपळद रस्त्यावर असलेल्या मळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. ओहळ नाका येथील मळ्यातील एका घराबाहे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
आई समोरच तीन वर्षीय चिमूरडीला बिबट्याने लक्ष करत तिच्यावर हल्ला केल्याने चिमूरडीचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक धावून आले होते.
मात्र, तो पर्यन्त बिबट्याने चिमूरडीचा मानेला पकडल्याने मोठ्या प्रमाणात दात शिरले होते त्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने चिमूकलीचा मृत्यू झाला होता. गावचे पोलिस पाटील अशोक गांगुर्डे आणि उपसरपंच योगेश आहेर यांच्यासह गावचे तलाठी मनोज राठोड, कोतवाल गंगाराम गोरे घटनास्थळी पोहचले होते.
घटनेनंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ माहिती देण्यात आली होती. ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसही दाखल झाल्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करून कुटुंबाला मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात वनविभाग कर्मचाऱ्यांना घेराव घालत वेळोवेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा जाब विचारत संताप व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहे. यामध्ये पशुधन देखील संकटात सापडले आहे. अनेक ठिकाणी पशूधनाला बिबट्याने लक्ष केले आहे. त्यामुळे बिबट्याची मोठी दहशत दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ओझर येथील एका गोठ्यात बिबट्या शिरला होता, त्यामध्ये एका वासरावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे इतर जनावरे देखील घाबरली होती, काही तास त्या जनवारांनी चारा खाल्ला नव्हता.
तर दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे गावातील सुरुवाडे वस्तीवरील एका वासरीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये बिबट्याने वासरीला फस्त केले होते. तर तिथून काही अंतरावर असलेल्या आहेर वस्तीच्या नजीक पंधरा दिवसापूर्वी वासरीवर हल्ला केला होता. त्यात वासरी मृत्यूमुखी पडली होती.
एकूणच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे निर्माण झाले आहे. मळे परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी लहान मुले असल्यास त्यांच्या जीवीताला मोठा धोका आहे.