नाशिक : नाशिकच्या पंचवटीत राहणाऱ्या एका गाडी मालकाला टोलच्या कारभाराचा अजब अनुभव आला आहे. खरंतर टोलवर फास्टटॅग ही यंत्रणा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. टोलवरील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ही नवी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे वेळेची बचत होत असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात काही ठिकाणी मात्र फास्टटॅग असतांना लांबच लांब रांगा बघायला मिळतात. त्यामुळे फास्टटॅग असूनही अनेकदा मनस्ताप होतो. तर काही वेळेला फास्टटॅगमुळे मोठी वेळेची बचत होते. त्यामुळे फास्टटॅग हा टोल वसूलीचा प्रकार चांगला असल्याचेही समोर आले आहे. मात्र नाशिक मधील प्रकार ऐकून तुम्ही सुद्धा चक्रावून गेल्याशिवाय राहणार आहे.
सुनील बुणगे नामक व्यक्ति पंचवटीमध्ये राहतात. ते घरी गाढ झोपेत असतांना त्यांना मेसेज आला. मात्र त्यांनी तो सकाळी झोपेतून जाग आल्यावर पहिला. मेसेज पाहून त्यांना धक्काच बसला.
झोपेतून ताडकन उठून त्यांनी आपली गाडी घराच्या बाहेर उभी आहे का बघितली, तर गाडी घराच्या बाहेर होती. टोलचे पैसे कट झाल्याचा मेसेज खरंतर बुणगे यांना आला होता. त्यामुळे आपली गाडीतर चोरीला गेली नाही ना? असा त्यांना संशय आला होता.
मात्र, तो संशयही दूर झाला. पण पैसे कसे काय कट झाले म्हणून त्यांनी चौकशी केली. ओळखीच्या व्यक्तींना फोन लावून माहिती घेतली. सिन्नरच्या टोलवरुन हा मेसेज आलेला असल्याने त्यांनी तिथेही संपर्क केला मात्र माहिती मिळाली नाही.
त्यांना त्याच क्रमांकावरून फोन आला आणि सांगितले की रात्रीच्या वेळी इथून एक गाडी केली. त्यामध्ये नंबर टाकतांना तुमच्या गाडीचा नंबर टाकला गेला म्हणून पैसे कट झाले ते पैसे तुम्हाला रिफंड होतील असे सांगून फोन ठेऊन दिला गेला.
पण, गाडीचा नंबर टाकून फास्टटॅगवरील पैसे कट होऊ शकतो असा प्रश्न त्यानंतर उपस्थित झाला. बुणगे यांनी याबाबत बरीच चौकशी केली मात्र अद्याप त्यांना उत्तर मिळाले नाही. गाडीचा नंबर एका अंकाने बदलू शकतो पण फास्टटॅगवरील नंबर कसा असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे.
खरंतर असा प्रसंग पहिल्यांदाच घडला असावा म्हणून याबाबत बुणगे यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या दृष्टीने पैसे गेले याचा त्रास नाही पण यातून कुठला गैरप्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल बुणगे यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.